Rashid Khan On Jonathan Trott: अफगाणिस्तानने आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचा शेवट विजयाने केला आहे. कॅनडाविरुद्ध झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने ८२ धावांनी विजयाची नोंद केली. या सामन्यात अफगाणिस्तानने कॅनडासमोर २०१ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना कॅनडाला ११८ धावांपर्यंत मजल मारता आली. या विजयानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट बद्दल मन जिंकणारं वक्तव्य केलं आहे.
टी-२० वर्ल्डकप झाल्यानंतर अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. सामना झाल्यानंतर बोलताना राशिद खान म्हणाला, “गेल्या चार ते साडेचार वर्षात आमचा त्यांच्यासोबतचा काळ खूप चांगला होता. माझा ठाम विश्वास आहे की, त्यांनी अफगाणिस्तान क्रिकेटसाठी खूप काही केलं आहे. आज आम्ही ज्या टप्प्यावर आहोत, तिथे या संघाला घडवण्यात आणि मार्गदर्शन करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांना निरोप देताना मन थोडं भावूक होत आहे. पण हेच आयुष्य आहे. आपण कायम एकत्र राहू शकत नाही, पण पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो.”
अफगाणिस्तानला सुपर ८ मध्ये प्रवेश करण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण अफगाणिस्तानचा संघ तिसऱ्या स्थानी राहिला. स्पर्धेतील प्रवासाबद्दल बोलताना राशिद खान म्हणाला, “आमची तयारी उत्तम होती आणि आम्ही संपूर्ण स्पर्धेत दमदार खेळ केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवाचा आम्हाला फटका बसला. आम्हाला माहीत होतं की, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आम्हाला सुरुवातीच्या २ पैकी एक सामन्यात विजय मिळवणं गरजेचं होतं. पण ही स्पर्धा अशीच आहे. पण यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. पुढच्या आयसीसी स्पर्धेत आम्ही जोमाने पुनरागमन करू.”
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ४ गडी बाद २०० धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना इब्राहिम झादरानने ५६ चेंडूत नाबाद ९५ धावांची खेळी केली. तर सेदीकुल्लाह अटलने ४४ धावा केल्या. कॅनडाला हा सामना जिंकण्यासाठी २०१ धावा करायच्या होत्या. पण कॅनडाचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. कॅनडाकडून फलंदाजी करताना हर्ष ठकेरने ३० धावांची खेळी केली. कॅनडाला ११८ धावांपर्यंत मजल मारता आली. अफगाणिस्तानने हा सामना ८२ धावांनी आपल्या नावावर केला.

