Rashid Khan 200 T20I Wickets Record: अफगाणिस्तानचा अनुभवी फिरकीपटू रशीद खानने गुरुवारी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात तादिवानाशे मरुमानीला बाद करत त्याने अनोखा विक्रम आपल्या नावे केला. रशीदने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० विकेट्सचा टप्पा गाठला.
टी-२० इतिहासात २०० विकेट्स घेणारा रशीद खान हा जगातील पहिलाच गोलंदाज ठरला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २२१ धावांचा डोंगर उभारला. अझमतुल्लाह उमरझाईने ११६ धावांची तुफानी खेळी केली, तर इजाज अहमदझाईने ५२ धावांचं योगदान दिलं. या दोघांच्या शानदार फलंदाजीच्या बळावर अफगाणिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली. झिम्बाब्वेकडून ब्रॅड इव्हान्स आणि कुंडई मातिगिमू यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत रशीद खानने आता मोठी आघाडी घेतली आहे. इंग्लंडचा आदिल रशीद १७१ विकेट्ससह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रशीदने ऑक्टोबर २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
रशीद खान (अफगाणिस्तान) – १२०* सामने – २०० विकेट्स
आदिल रशीद (इंग्लंड) – १५३ सामने – १७१ विकेट्स
एहसान खान (हॉंगकॉंग) – ११९ सामने – १६५ विकेट्स
ईश सोढी (न्यूझीलंड) – १४२ सामने – १६५ विकेट्स
टीम साऊदी (न्यूझीलंड) – १२६ सामने – १६४ विकेट्स
सप्टेंबर २०२५ मध्ये रशीदने पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होण्याचा मान मिळवला होता. शारजाह येथे संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध झालेल्या तिरंगी मालिकेतील सामन्यात त्याने न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज टीम साऊदीचा विक्रम मोडला होता. त्या सामन्यात रशीदने २१ धावांत ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याच्या विकेट्सची संख्या १६५ झाली होती, तर साऊदीच्या नावावर १६४ विकेट्स होत्या. पण आता रशीदने सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर २०० विकेट्सचा ऐतिहासिक टप्पा गाठला.
दरम्यान, अझमतुल्लाह उमरझाई आणि इजाज अहमदझाई यांनी सहाव्या विकेटसाठी केलेली १४२ धावांची भागीदारीही विक्रमी ठरली. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाव्या विकेटसाठी झालेली ही सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वी आंद्रे रसेल आणि शेरफेन रदरफोर्ड यांच्या नावावर १३९ धावांच्या भागीदारीचा विक्रम होता. अफगाणिस्तानच्या या जोडीने तो विक्रम मोडीत काढला.
