Rashid Khan World Record in T20 History: टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आज १६ फेब्रुवारीला पहिला सामना अफगाणिस्तान व युएई यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान पहिल्या डावात खेळत असताना संघाचा कर्णधार रशीद खानने एक विकेट घेताच टी-२० इतिहासात विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.
अफगाणिस्तान संघाने टी-२० विश्वचषकातील सर्व सामन्यांमध्ये कडवी झुंज दिली आहे. न्यूझीलंडविरूद्ध आणि नंतर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध संघाला पराभव पत्कारावा लागल्याने संघ जवळपास गट टप्प्यातून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तर दोन सुपर ओव्हरनंतर अखेरच्या चेंडूवर अफगाणिस्तानला पराभव पत्करावा लागला. यानंतर आता संघ युएईविरूद्ध सामना खेळत आहे.
रशीद खानच्या गोलंदाजीवर युएईचा फलंदाज मुहम्मद अरफान हिट विकेट होत बाद झाला. रशीदच्या फिरकीविरूद्ध खेळताना त्याचा तोल गेला आणि थेट विकेटवर बॅट मारली. या सामन्यातील रशीदची ही पहिली विकेट होती. यासह रशीदने टी-२० क्रिकेटमध्ये ७०० विकेट्सचा मोठा टप्पा गाठला.
रशीद खानने टी-२० मध्ये इतिहास घडवला
रशीद खान हा टी-२० इतिहासात ७०० विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आणि हा अनोखा विश्वविक्रम त्याने आपल्या नावे केला. रशीद टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय जगभरात विविध टी-२० लीग खेळतो. जिथे त्याने आपल्या फिरकीने मैदान गाजवलं आहे आणि यासह त्याने ७०० विकेट्सचा टप्पा गाठला. रशीद खानने ५१२ टी-२० डावांमध्ये ६.५९च्या इकॉनॉमीने व १८.५०च्या उत्कृष्ट सरासरीसह ७०० विकेट्स पूर्ण केल्या. यादरम्यान त्याची उत्कृष्ट गोलंदाजी कामगिरी ही १७ धावा देत ६ विकेट्स अशी आहे.
रशीद खानच्या आधी ड्वेन ब्रावोच्या सर्वाधिक विकेट्सचा विक्रम होता, जो रशीदने फार पूर्वीच आपल्या नावे करत त्याला मागे टाकलं होतं. रशीद खान आता फक्त २७ वर्षांचा असून टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्सचा मोठा आकडा रशीद गाठू शकतो, यात शंकाच नाही. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानेही रशीद खानच्या ७००० विकेट्स पूर्ण झाल्याची पोस्ट शेअर केली आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
रशीद खान – ७०० विकेट्स
ड्वेन ब्रावो – ६३१ विकेट्स
सुनील नरेन – ६१३ विकेट्स
इमरान ताहिर – ५७२ विकेट्स
आंद्रे रसेल – ५०८ विकेट्स

