गेल्या वर्षी आरसीबीने १८ वर्षात पहिल्यांदाच जेतेपदाला गवसणी घातली. त्यावेळी जोश हेझलवूड, भुवनेश्वर कुमार आणि यश दयाळ हे त्यांचे प्रमुख गोलंदाज होते. या त्रिकुटामुळे रसिख सलामला केवळ दोन सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. यंदा मैदानाबाहेरच्या कारणांमुळे यश दयाळ हंगामात खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. साहजिकच रसिख सलामला तिसरा गोलंदाज म्हणून निवडण्यात आलं. संघव्यवस्थापनाने टाकलेला विश्वास रसिखने .. विकेट्ससह सिद्ध केला.

कृणाल पंड्याच्या सूचनेनंतर रसिख जम्मू काश्मीरऐवजी बडोद्याकडून खेळू लागला. याआधीच्या हंगामांमध्ये हर्षल पटेलला गोलंदाजी करताना पाहून रसिखने अनेक गोष्टी टिपल्या. बुंध्यात पडणारा फसवा यॉर्कर, स्लो कटर, स्लोअरवन टाकण्याचं कौशल्य रसिखने शिकून घेतलं. जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमार या अनुभवी खेळाडूंबरोबर सरावाचा मोठा फायदा रसिखला झाला. दडपणाच्या क्षणी, हाणामारीच्या षटकांमध्ये शांत राहून अचूक टप्प्यावर गोलंदाजी कशी करावी हे रसिख शिकला. यंदाच्या हंगामात भुवनेश्वर-हेझलवूडच्या बरोबरीने रसिखने जबाबदारी स्वीकारली. यश दयाळची अनुपस्थिती जाणवू दिली नाही. बंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीत असताना रसिखच्या गोलंदाजीने ऋषभ पंत प्रभावित झाला होता. ऋषभने त्याच्या नावाची शिफारस दिल्ली संघव्यवस्थापनाला केली होती. मात्र लिलावात आरसीबीने त्याला ताफ्यात घेतलं. स्विंग गोलंदाज ही प्रमुख ओळख असणाऱ्या रसिखने सातत्याने भात्यात नवनवीन अस्त्रं वाढवली आहेत.

२०१८ लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला ताफ्यात घेतलं. आयपीएल स्पर्धेत खेळणारा जम्मू काश्मीरचा तो केवळ तिसरा खेळाडू ठरला. १७व्या वर्षीच त्याने आयपीएल पदार्पण केलं. पहिल्या हंगामानंतर काही महिन्यातच बीसीसीआयने वयाच्या दाखल्यात फेरफारप्रकरणी दोन वर्षांची बंदी घातली. बंदीचा कालावधी पूर्ण झाल्यावर २०२२ हंगामात तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला. २०२४ मध्ये तो दिल्लीकडे होता. २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने त्याला ताफ्यात दाखल करून घेतलं. २०२५ मध्ये बहुतांश सामने रसिख राखीव खेळाडूंमध्येच होता. मात्र या दोन महिन्यात तो अनेक गोष्टी शिकला. या सगळ्याचा फायदा त्याला यंदा होताना दिसत आहे.

पॉवरप्ले,मधल्या षटकांमध्ये तसंच हाणामारीच्या अशा तिन्ही टप्प्यात अचूक शिस्तबद्ध गोलंदाजी करत रसिखने कर्णधाराचा विश्वास जिंकला. रसिखने १२ सामन्यात २२ विकेट्स पटकावल्या आहेत. फायलनच्या महत्त्वपूर्ण लढतीत रसिखने निशांत सिंधू, राहुल टेवाटिया आणि रशीद खान यांना बाद करत गुजरातच्या डावाला खिंडार पाडलं.