दुसऱ्या पर्वाच्या लिलावात सर्वाधिक बोलीसह रत्नागिरी संघात
महाराष्ट्र कबड्डी प्रीमियर लीगच्या (महाकबड्डी) दुसऱ्या पर्वासाठी झालेल्या लिलावात दीपिका जोसेफ आणि स्वप्निल शिंदे यांनी बाजी मारली आहे. दीपिकासाठी सर्वाधिक ९४ हजार रुपये बोली लावत रत्नागिरीने तिला संघात स्थान दिले आहे, तर स्वप्निलसाठी सर्वात जास्त ८८ हजार रुपये बोलीसह कोल्हापूरने तिला संघात स्थान दिले आहे.
पुरुषांमध्ये नीलेश काळबेरेला ७८ हजार रुपये किमतीला ठाण्याने, चेतन थोरातला ४८ हजार रुपयांना रत्नागिरीने आणि संकेत चव्हाणला ५२ हजार रुपयांना मुंबईने संघात स्थान दिले. महिलांमध्ये रक्षा नारकर (३४ हजार) आणि लविना गायकवाड (३० हजार) यांचा मुंबईने संघात समावेश केला.
महाकबड्डी लीगच्या दुसऱ्या पर्वाला १२ जानेवारीपासून प्रारंभ होत असून, ते २९ जानेवारीपर्यंत चालणार आहे. बारामती आणि नगर या फ्रेंचायझी रद्द करण्यात आल्या असून, त्यांच्या जागी िपपरी-चिंचवड आणि कोल्हापूर या दोन नव्या संघांना स्थान देण्यात आले आहे. पूर्वीच्या संघातील खेळाडू या संघातच राहणार आहेत. गेल्या वर्षीच्या संघातून फ्रेंचायझींनी एकूण ४९ खेळाडू उपलब्ध केले आहेत. या वर्षी स्पर्धा केवळ कोल्हापूर आणि ठाणे या दोन केंद्रांवरच होणार आहेत. दोन्ही केंद्रांवर प्रत्येकी आठ दिवस सामने होतील.
या वर्षी ग्रामीण भागातील खेळाडूंना सामावून घेण्याचा प्रयत्न केला असून, त्यासाठी फ्रेंचायझींना संघात १२ खेळाडू घेण्याची परवानगी देण्यात आली. त्यासाठी नव्याने निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. पुणे, ठाणे, औरंगाबाद अशा विविध केंद्रांवर निवड चाचणी घेऊन लिलावासाठी २११ खेळाडू निश्चित करण्यात आले होते. त्यातून ४९ खेळाडूंची पुण्यात झालेल्या लिलावात फ्रेंचायझींनी निवड केली.
संघमालक
पुणे : राजेंद्र देशमुख (पुरुष), दत्ता आणि प्रकाश बालवडकर (महिला)
मुंबई : शिवाजी पाटील (पुरुष- महिला)
ठाणे : कृष्णा पाटील (मुले), प्रकाश जाधववार (मुली)
रत्नागिरी : अजय इंगळे (मुली), शशांक कदम, अंकुश मोरे (मुले)
रायगड : आस्वाद पाटील, सवाई पाटील (पुरुष- महिला)
िपपरी चिंचवड : नीलेश लोखंडे (पुरुष- महिला)
सांगली : नितीश िशदे, पोपट पाटील (पुरुष- महिला)
कोल्हापूर : दीपक पाटील (महिला), खंडेराव जाधव (पुरुष)