मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) माजी उपाध्यक्ष रत्नाकर शेट्टी यांनी एमसीएविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबईतील एका स्थानिक न्यायालयात शेट्टी यांनी पाच वर्षांच्या बंदीला स्थगिती देण्यासाठी एमसीएविरोधात फौजदारी खटला दाखल केला असून, ५० लाख रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा त्यांनी केला आहे.  
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अहमदाबाद येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या ट्वेन्टी-२० सामन्यात तिकीटांचा काळाबाजार केल्याच्या आरोपाखाली एमसीएने गेल्या महिन्यात शेट्टी यांच्यावर बंदी घातली होती. गेल्या शुक्रवारी हा खटला दाखल करण्यात आल्यानंतर बुधवारी एमसीएला या प्रकरणी नोटिस पाठवण्यात आली. गुरुवारी या विषयावर चर्चा करण्यासाठी एमसीएच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली. एमसीएचे अध्यक्ष रवी सावंत परदेशात असल्यामुळे उपाध्यक्ष विनोद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.
बंदीचा निर्णय घेणाऱ्या कार्यकारिणी समितीतील प्रत्येक सदस्याविरोधात आणि एमसीएविरोधात हा खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी होणार आहे. आपली प्रतिमा मलीन केल्याचा आरोप  शेट्टी यांनी या याचिकेत केला आहे.