मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एसमीए) माजी उपाध्यक्ष रत्नाकर शेट्टी यांनी पाच वर्षांची निलंबनाच्या कारवाईसंदर्भात एसमीएला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. एमसीएने ही नोटीस स्वीकारली असून याला उत्तर पाठवण्यासाठी सध्या ते कायदेशीर सल्लागारांकडून सल्ला घेत आहेत.
‘‘शेट्टी यांची नोटीस आम्ही स्वीकारली आहे आणि याला उत्तर काय द्यायचे याचा सल्ला आम्ही वकिलांकडून घेत आहोत. या नोटिशीमध्ये घालण्यात आलेली पाच वर्षांची बंदी मागे घेण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे. गुरुवारी शेट्टी यांनी आम्हाला नोटीस पाठवली असून त्यांना ४८ तासांमध्ये उत्तर द्यायचे आहे,’’ असे एमसीएमधील सूत्रांनी सांगितले.
शेट्टी गेल्या तीस वर्षांपासून एमसीएमध्ये कार्यरत आहेत. शेट्टी यांनी एमसीएच्या काही पदाधिकाऱ्यांवर अहमदाबाद येथे झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तिकिटांचा गैरव्यवहार केल्याचे आरोप केले होते. त्यानंतर एमसीएने शेट्टी यांना याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. पण शेट्टी यांचे स्पष्टीकरण एमसीएला पुरेसे न वाटल्याने त्यांच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय ३ जूनला घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात शेट्टी यांनी गुरुवारी एमसीएला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.