राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रावर सट्टेबाजीचे आरोप करण्यात आल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी नवी दिल्लीमध्ये कार्यकारिणी समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत या विषयावर चर्चा होणार असून गरज पडल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, ‘‘१० जूनला होणाऱ्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये राज कुंद्रा प्रकरणावर चर्चा होणार आहे. या प्रकरणाची सखोल चर्चा केल्यानंतर जर कठोर कारवाईची आवश्यकता वाटल्यास ती करण्यात येईल.’’
बडोदा क्रिकेट असोसिएशनच्या संजय पटेल यांच्याकडे बीसीसीआयचे सचिवपद सोपविण्यात आले आहे, तर खजिनदाराची घोषणा नंतर करण्यात येईल, असे दालमिया यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘चौकशी आयोगामध्ये बीसीसीआयचा कोणताही सदस्य नसेल. उच्च न्यायालयातील दोन निवृत्त न्यायमूर्ती टी. जयराम चौटा आणि आर. सुब्रमण्यम यांचा द्विसदस्यीय आयोग गुरुनाथ मयप्पन आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यावरील आरोपाची चौकशी करणार आहे. या चौकशीसाठी कोणतीही वेळमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.’’
‘‘दिल्ली आणि मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे लाचलुचपतविरोधी आणि सुरक्षा विभागाचे प्रमुख रवी सवानी यांनी आपला अहवाल बीसीसीआयच्या मुंबई कार्यालयाकडे सादर केला आहे,’’ असे त्यांनी पुढे सांगितले.

धोनीच्या गुंतवणुकीबाबत दालमियांची ‘थांबा आणि वाट पाहा’ची भूमिका
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे ऱ्हिती स्पोर्ट्स या खेळाडूंच्या व्यवस्थापन कंपनीमध्ये समभाग असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले असले तरी त्यावर बीसीसीआयने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. गुरुवारी बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी या प्रकरणात चॅम्पियन्स करंडकानंतर लक्ष घालणार असल्याचे सांगितले. ‘‘सध्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धा सुरू असल्याने आम्ही धोनीच्या कामात व्यत्यय आणू इच्छित नाही, पण याचा अर्थ आम्ही हे प्रकरण सोडमून दिले असा होत नाही. चॅम्पियन्स करंडक संपल्यावर याप्रकरणी आम्ही लक्ष घालणार असून थोडा वेळ थांबा आणि बघा, असे दालमिया म्हणाले.