ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता रवी दहिया आगामी जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या भारतीय कुस्ती महासंघाच्या निवड चाचणीसाठी अपुरी तयारी झाल्यामुळे खेळू शकणार नसल्याचे रवीने म्हटले आहे.

ओस्लो (नॉर्वे) येथे २ ते १० ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी पुढील आठवड्यात मंगळवारी राष्ट्रीय संघटनेकडून निवड चाचणीचे आयोजन केले आहे. ‘‘अपुऱ्या सरावानिशी स्पर्धेत किंवा मॅटवर उतरणे मला पटत नाही. या स्थितीत मी निवड चाचणीतच उतरू शकत नसल्यामुळे जागतिक स्पर्धेत खेळू शकणार नाही,’’ असे रवीने म्हटले आहे.

टोक्यो ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या बजरंग पुनियाने गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेतल्यानंतर जागतिक स्पर्धेला मुकणारा रवी हा भारताचा दुसरा मातब्बर कुस्तीपटू आहे.