टॉस कोण जिंकतंय ते पाहूया, जाऊया रवी शास्त्रींकडे असं प्रक्षेपणकर्त्या वाहिनीच्या निवेदकाने जाहीर केलं. नेहमीप्रमाणे चाहत्यांना रवी शास्त्रीचा भारदस्त आवाज ऐकायला मिळेल अशी आशा होती पण दिसलं ते वेगळंच होतं. झिम्बाब्वेचा पोमी मंगव्वा टॉससाठी हजर होते. भारताच्या लढतींना रवी शास्त्री टॉसवेळी निवेदकाच्या भूमिकेत असतात. आपल्या खास भारदस्त आवाजात ते दोन्ही कर्णधारांची ओळख करून देतात. त्यानंतर सामनाधिकारी कोण, टॉस प्रतिनिधी कोण ते सांगतात. अनेकदा सामना जिथे सुरू आहे तिथल्या स्थानिक भाषेतही बोलतात. त्यामुळे रवी शास्त्री यांचा आवाज ऐकण्यासाठी चाहते उत्सुक असतात. मात्र रविवारी टॉसवेळी तटस्थ देशाचा निवेदक उपस्थित असल्याचं चाहत्यांना पाहायला मिळालं.

सोशल मीडियावर तात्काळ यासंदर्भात चौकशी, विचारणा होऊ लागली. आयसीसीने यासंदर्भात कोणतंही भाष्य केलेलं नाही. सर्वसाधारणपणे ज्या संघांचा सामना आहे त्या देशांचे माजी खेळाडू टॉसवेळी उपस्थित असतात. भारताच्या सामन्यांना प्रामुख्याने रवी शास्त्रीच असतात. मात्र आज रवी शास्त्री असणं अपेक्षित असताना पोमी मंगव्वा दिसल्याने चाहते गोंधळून गेले आहेत. हँडशेक करणार नसल्यामुळे पाकिस्तानला पुन्हा एकदा तटस्थ देशाचा निवेदक ही मागणी रेटली आहे का? असा प्रश्न भारतीय चाहत्यांनी विचारला आहे.

दरम्यान रवी शास्त्री टॉसवेळी नसले तरी सामन्याच्या समालोचनाला ते आहेत. सामन्याची सुरुवात त्यांच्याच खास शैलीत झाली. रवी शास्त्री यांच्याबरोबरीने पाकिस्तानचे माजी खेळाडू वासिम अक्रम आणि वकार युनिस समालोचन कक्षात आहेत.

आशिया चषकातही हँडशेक प्रकरण झालं तेव्हा पाकिस्तानने तटस्थ देशाचा निवेदक असावा अशी मागणी केली होती. याखेपेसही पाकिस्तानने अशी मागणी केली आहे का हे समजू शकलेलं नाही. दरम्यान भारतीय संघाने या लढतीसाठी संघात दोन बदल केले आहेत. अभिषेक शर्मा पोटाच्या आजारातून पूर्णपणे बरा होऊन परतला आहे. अर्शदीप सिंगऐवजी कुलदीप यादवला प्राधान्य देण्यात आलं आहे.

टी२० वर्ल्डकपच्या कोलंबोतल्या लढतीदरम्यान पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतला आहे. सर्वसाधारणपणे टॉसच्या वेळी दोन्ही कर्णधार एकमेकांशी हस्तांदोलन करतात. सामना संपल्यानंतर शिष्टाचाराचा भाग म्हणून खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करतात. मात्र भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध यापैकी काहीही करणार नसल्याचं समजतं. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघाशी हस्तांदोलन केलं नाही. सामना संपल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानशी हस्तांदोलन केलं नाही. या भूमिकेवर जोरदार टीकाही झाली आणि अनेकांनी त्याला पाठिंबाही दर्शवला. हीच भूमिका टीम इंडिया टी२० वर्ल्डकपमध्येही कायम राखणार आहे.

पाकिस्तानने टी२० वर्ल्डकपमधल्या भारताविरुद्धच्या लढतीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. आर्थिक नुकसान तसंच अन्य नुकसान आणि आयसीसीच्या मध्यस्थीनंतर पाकिस्तानने भारताविरुद्धची लढत खेळण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ भारतात येणार नसल्यामुळे हा सामना कोलंबोतल्या आर.प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. सामना होणार असला तरी भारतीय संघ या सामन्यात हस्तांदोलन प्रथेचं पालन करणार नाही.

बांगलादेशने सुरक्षिततेच्या कारणास्तव टी२० वर्ल्डकपमधून माघार घेतली. आयसीसीने त्यांना निर्णयाचा पुनर्विचार करायला सांगितलं. आमच्या लढती श्रीलंकेत खेळवा अशी मागणी बांगलादेशने केली होती. मात्र आयसीसीने ही मागणी फेटाळली. आम्हाला अन्य गटात खेळवा असंही बांगलादेश बोर्डाचं म्हणणं होतं. मात्र आयसीसीने या मागणीलाही नकार दिला. आयसीसीने निर्णय घ्यायला आणखी एक दिवस दिला. मात्र सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे हे स्पष्ट करत बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं. बांगलादेशऐवजी स्कॉटलंडला संधी देण्यात आलीय. बांगलादेशला फक्त पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पाठिंबा मिळाला. आयसीसी बैठकीत फक्त पाकिस्तानने बांगलादेशच्या बाजूने कौल दिला होता.