Ravi Shastri, IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटीतील बारसापरा स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावूमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने ४८९ धावांचा डोंगर उभारला. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी २ दिवस टिचून फलंदाजी केली. त्यामुळे भारतीय फलंदाजांना दुसऱ्या दिवशी काही षटकांसाठी फलंदाजीला यावं लागलं. या सामन्यावर दक्षिण आफ्रिकेची मजबूत पकड आहे. त्यामुळे भारतीय संघाला जर हा सामना जिंकायचा असेल, तर काय करावं लागेल? याबाबत रवी शास्त्री यांनी मोलाचा सल्ला दिला आहे.
भारतीय संघाला दुसऱ्या दिवसाच्या शेवटी फलंदाजीला यावं लागलं. त्यावेळी भारतीय फलंदाज ९ धावा करून नाबाद परतले. भारतीय संघाला जर हा सामना जिंकायचा असेल, तर तिसऱ्या दिवशी विकेट्स सांभाळून धावांचा पाऊस पाडणं गरजेचं असणार आहे. दरम्यान दुसरा कसोटी सामना जिंकण्यासाठी रवी शास्त्री यांनी भारतीय संघाला आगळा वेगळा सल्ला दिला आहे.
काय म्हणाले रवी शास्त्री?
या सामन्यातील तिसरा दिवस सुरू आहे. त्यामुळे रवी शास्त्रींच्या मते, भारतीय खेळाडूंनी फलंदाजीत फार वेळ वाया घालवायला नको. फलंदाजांनी वेगाने धावा करायल्या हव्यात. आवश्यकता असल्यास भारताने दक्षिण आफ्रिकेपेक्षा १०० धावा कमी करूनही डाव घोषित करावा. त्यामुळे भारतीय गोलंदाज गोलंदाजी करताना झटपट विकेट्स काढतील आणि सामना खेचून आणतील. महत्वाची बाब म्हणजे, भारतीय संघाने असं केवळ ४ वेळा केलं आहे. जेव्हा विरोधी संघापेक्षा कमी धावसंख्येवर डाव घोषित केला आहे. पण नेहमीच भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय संघाने असं केल्यानंतर ४ वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, “उद्या (२४ नोव्हेंबर)भारतीय संघाला काही मोठे निर्णय घ्यावे लागतील. फलंदाज नवीन चेंडूवर कशी फलंदाजी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. असंही होऊ शकतं तुम्ही लवकर डाव घोषित करा आणि त्यांना लवकरात लवकर ऑलआऊट करण्याचा प्रयत्न करा.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “तुम्ही ४८९ धावांची बरोबरी करण्याची वाट पाहू नका. त्यासाठी बराच वेळ लागेल. तु्म्ही ८०,९० किंवा १०० धावा असताना डाव घोषित करू शकता. आता सामन्यात काय होणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.” या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला २ मोठे धक्के बसले आहेत. आधी केएल राहुल अवघ्या २२ धावांवर माघारी परतला. तर दुसरी बाजूला असलेल्या यशस्वी जैस्वालने अर्धशतकी खेळी कलेी.
