टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडशी भिडणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या अखेरच्या सुपर-८ सामन्यात विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये धडक मारली. पण अभिषेकच्या फॉर्मबद्दल भारतीय संघ नक्कीच चिंतेत असेल, ज्याने आतापर्यंत सहा डावांमध्ये एका अर्धशतकासह ८० धावा केल्या आहेत. आता, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका अटीवर अभिषेकला उपांत्य फेरीत संधी द्यावी असा सल्ला दिला आहे.
अभिषेक शर्मा टी-२० विश्वचषकातील सुरूवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये शून्यावर बाद होत माघारी परतला. यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध धावांचं खातं उघडलं पण स्वस्तात बाद झाला. यानंतर झिम्बाब्वेविरूद्ध सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली. पण त्यानंतर वेस्ट इंडिजविरूद्ध सामन्यातही त्याने लवकर विकेट गमावली. याशिवाय त्याने या सामन्यात २ महत्त्वाचे झेलदेखील सोडले.
रवी शास्त्री अभिषेक शर्माबद्दल म्हणाले, “संघ व्यवस्थापनाला जर असं वाटलं की मानसिकदृष्ट्या तो सध्या योग्य स्थितीत नाही, त्याचा आत्मविश्वास ढासळलेला आहे, तर त्याचा निर्णय त्यांनी घेत त्याला ड्रॉप करायचं आहे. त्याच्याशी संवाद साधून, नेट्समध्ये तो कसा फलंदाजी करतोय हे पाहूनच बाहेरून त्याचा अंदाज घेता येईल. जर अशी स्थिती असेल, तरच मी इशान किशनला वरच्या क्रमांकावर पाठवण्याचा विचार करेन आणि कदाचित रिंकू सिंहला खालच्या फळीत आणेन,” असं शास्त्री म्हणाले.
मात्र, अभिषेक शर्माला प्लेईंग इलेव्हनमध्ये कायम ठेवायला हवं, यावर त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे भर दिला. इंग्लंडविरुद्धची त्याची यापूर्वीची यशस्वी कामगिरी आणि वानखेडे स्टेडियममधील फलंदाजीस पोषक परिस्थिती ही त्याला संधी देत राहण्यासाठी मजबूत कारणं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
शास्त्री म्हणाले, “मात्र, तरीही मी त्याच्यावर विश्वास ठेवेन. भारता आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेत खेळताना त्याने अफलातून कामगिरी केली होती. वानखेडेवरील त्याचं योगदान मी दुर्लक्षित करणार नाही. त्याने यापूर्वी चांगली कामगिरी केली आहे. तिथे त्याच्या नावावर शानदार जलद शतकं आहेत. फलंदाजीत पुरेसं सामर्थ्य आहे, त्यामुळे मी त्याच्यावरच ठाम राहीन,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
