Ravi Shastri on Virat Kohli and Rohit Sharma: भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी मुख्य प्रशिक्षक यांनी विराट कोहली आणि रोहित शर्माची बाजू घेतली असून त्यांच्या भवितव्याबाबत वावड्या उठवणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. आगामी २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारताचा संघ कसा असेल आणि त्यात या दोन वरिष्ठ खेळाडूंचे स्थान असेल का? यावरून गेले काही दिवस बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. या चर्चांवर बोलत असताना रवी शास्त्री यांनी संताप व्यक्त केला.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलत असताना रवी शास्त्री यांनी दोन्ही ज्येष्ठ खेळाडूंना बाजूला करणे योग्य नसल्याचे म्हटले. कसोटी आणि टी२० क्रिकेटमधून विराट कोहली आणि रोहित शर्माने निवृत्ती घेतल्यानंतर दोन्ही खेळाडूंच्या क्षमतांवर शंका घेणाऱ्यांना रवी शास्त्री यांनी सुनावले आहे.
प्रभात खबरला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री म्हणाले, “विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही एकदिवसीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आहेत. तुम्ही अशा गुणवंत खेळाडूंशी गैरव्यवहार करू शकत नाहीत.” या दोघांच्या क्षमतेवर कोण शंका घेत आहे? असा प्रश्न रवी शास्त्री यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी कुणाचेही नाव घेतले नाही.
रवी शास्त्री म्हणाले, काही लोक असा प्रयत्न करत आहेत. म्हणून मी असे म्हणालो. “जर या दोघांनी आपला रोख बदलला आणि योग्य ती कळ दाबली तर जे त्यांच्याबाबत कुचाळक्या करत आहेत, ते कुठच्या कुठे फेकले जातील”, असेही ते म्हणाले.
रवी शास्त्री यांचे विराट कोहलीशी अतिशय जवळचे संबंध आहेत. तर रोहित शर्माबरोबरही त्यांनी जवळून काम केले आहे.
त्या दोघांचं डोकं…
प्रभात खबरशी बोलताना ते म्हणाले, “अशा खेळाडूंबरोबर तुम्ही मस्ती करू नका. काही जण असे करत आहेत. पण त्या दोघांचं (विराट आणि रोहित) डोकं ठिकाणावर आलं आणि त्यांनी निर्णय घेतला तर आजूबाजूला जे दिसत आहेत, ते सर्व गायब होतील.”
रवी शास्त्री यांचे विधान अशा परिस्थितीत आले आहे, जेव्हा भारतीय क्रिकेट संघ अडचणीत आहे. दक्षिण आफ्रिकेने कसोटी मालिकेत भारताला पराभवाची धूळ चारल्यानंतर कसोटी संघावर बरीच टीका झाली. तसेच २०२७ च्या विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवून संघात बदल केले गेले, तेही वादाच्या केंद्रस्थानी आहेत.
