टी-२० वर्ल्डकपनंतर रवी शास्त्री यांचे टीम इंडियासोबतचे संबंध तुटणार आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड पदभार स्वीकारणार आहे. अशा स्थितीत समालोचकापासून कोचिंगपर्यंत प्रवास केलेले रवी शास्त्री आता काय करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. क्रिकबझ आणि टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, शास्त्री आता नव्या जबाबदारीला अंगावर घेणार आहेत.

शास्त्री आयपीएलमध्ये दिसणार आहेत. आयपीएलचा १५वा हंगाम २०२२ मध्ये खेळवला जाणार आहे. नव्या हंगामात संघांची संख्याही आठ वरून दहा होईल. अहमदाबाद आणि लखनऊ या स्पर्धेत दोन नवीन फ्रेंचायझी जोडणार आहेत. CVC कॅपिटल्सने रवी शास्त्री यांची अहमदाबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. भरत अरुण हे गोलंदाजी प्रशिक्षक, तर आर श्रीधर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. मात्र, याबाबत रवी शास्त्री आणि अहमदाबाद फ्रेंचायझीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

हेही वाचा – T20 WC: “…असं झालं तर मी खेळू शकणार नाही”, कप्तानपद सोडताना विराटनं व्यक्त केल्या भावना!

रवी शास्त्री २०१६ मध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनले होते. शास्त्री यांनी गेल्या १५ वर्षांत भारतीय संघासोबत विविध भूमिकेत काम केले आहे. दोन वेळा मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. शास्त्री पुन्हा कॉमेंट्री करू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ते बराच काळ कॉमेंट्रीशी जोडले गेले होते. एकेकाळी त्यांचा आवाज चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय झाला होता. त्यानंतर ते कोचिंगमध्ये आले.

शास्त्री आणि कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने खूप यश मिळवले. टीम इंडियाने परदेशी भूमीवर सातत्याने चांगला खेळ केला. शास्त्रींच्या मार्गदर्शनाखालील भारत हा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला हरवणारा पहिला आशियाई संघ ठरला. ही किमया त्यांनी दोनदा केली आहे.