Ravi Shastri All Time Great Indian Players: भारतीय क्रिकेट संघाने गेल्या काही दशकांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर राज्य केलं आहे. भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनेक स्टार खेळाडू दिले. ज्यात सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर सारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे जेव्हा सर्वोत्तम ५ खेळाडूंची निवड करण्याची वेळ येते, तेव्हा नेमके ५ कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडतो. दरम्यान भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारतीय ऑल टाईम ग्रेट ५ खेळाडूंची निवड केली आहे. या यादीत त्यांनी वर्ल्डकपविजेत्या कर्णधाराला स्थान दिलेलं नाही.
रवी शास्त्री यांनी स्टिक टू क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकल वॉनच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं, “७० च्या दशकात सनी (सुनील गावसकर), ८० च्या दशकात कपिल, ९० च्या दशकात सचिन, मग मी धोनी आणि विराटची निवड करेन.”
या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या ॲलेस्टर कूकने विचारलं, यांपैकी नंबर १ कोण? यावर उत्तर देताना सुनील गावसकर म्हणाले, “फलंदाजीबद्दल बोलायचं झालं, तर कपिल उत्तम आहे. एकूण बोलायचं झालं तर, तो सचिन तेंडुलकर असेल. तो बराच काळ देशासाठी खेळला आहे. त्याने २४ वर्ष देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याने १०० शतकं झळकावली आहेत. त्याने प्रत्येक दशकातील वेगवान गोलंदाजांचा सामना केला आहे.”
हे आहेत रवी शास्त्री यांनी निवडलेले ऑल टाईम ग्रेट भारतीय क्रिकेटपटू
१)सचिन तेंडुलकर
२)विराट कोहली
३) सुनील गावसकर
४) एमएस धोनी
५) कपिल देव
रवी शास्त्री यांनी निवडलेले पाचही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू आहेत. या पाचही खेळाडूंनी भारतीय क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यात मोलाचं योगदान दिलं आहे. पण रवी शास्त्री यांनी भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आयसीसी टी -२० वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या रोहित शर्माचा उल्लेख सुद्धा केलेला नाही. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

