भारतीय संघाकडे आतापर्यंत पाहिले तर बऱ्याच महान क्रिकेटपटूंनी विक्रम रचले. भारतीय संघ हा त्या खेळाडूंच्या नावाने ओळखला जायचा. पण त्या महान खेळाडूंना जे कारकीर्दीत जमले नाही ते या संघाने करून दाखवले आहे. आमच्यासाठी वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघ महत्त्वाचा आहे. सांघिक कामगिरी आमच्यासाठी सर्व काही आहे. त्यामुळेच हा भारताचा सर्वोत्तम संघ ठरतो, असे मत संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

‘या भारतीय संघातील खेळाडू दोन वर्षांपासून एकत्र आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे चांगला अनुभव आणि समन्वय आहे. त्यामुळे भारतीय संघातील काही महान खेळाडूंना जे जमले नाही ते या खेळाडूंनी करून दाखवले आहे. या श्रीलंकेत दोन वर्षांपूर्वी मिळवलेला ऐतिहासिक विजय, हे त्याचेच एक उदाहरण आहे,’ असे शास्त्री यांनी सांगितले.

भारताने श्रीलंकेला पहिल्या कसोटी सामन्यात सहज पराभूत केले होते. या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दुसरा सामना गुरुवारपासून सुरू होणार आहे. २०१५ साली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंकेत तब्बल २२ वर्षांनी विजय मिळवला होता. त्यापूर्वी मोहम्मह अझरुद्दिनच्या नेतृत्वाखाली भारताने १९९३ साली श्रीलंकेत मालिका विजय मिळवला होता.

‘भारतीय संघात काही महान खेळाडू २० वर्षेही खेळले, पण त्यांना संघाला श्रीलंकेत मालिका जिंकवून देता आली नव्हती. बऱ्याचदा त्यांनी श्रीलंकेचा दौरा केला असला तरी त्यांना मालिका मात्र जिंकता आली नव्हती. पण या युवा संघाने मात्र ते करून दाखवले आहे. यापूर्वी भारतीय संघाला परदेशात जे यश मिळवता आले नाही ते हा संघ नक्कीच मिळवून देऊ शकतो,’ असे शास्त्री म्हणाले.

गेल्या काही वर्षांमध्ये राहुल द्रविड आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारताने परदेशात मालिका जिंकली होती. पण कोहलीकडे अजूनही बराच कालावधी असून तो नक्कीच हे चित्र बदलू शकतो, असा विश्वास शास्त्री यांनी व्यक्त केला.

‘विराटला जेव्हा नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती तेव्हापासून आतापर्यंत त्याच्यामध्ये बराच बदल झाला आहे. अ‍ॅडलेडमध्ये जेव्हा त्याने पहिल्यांदा संघाचे नेतृत्व केले तेव्हा मीदेखील संघाचा एक भाग होतो. त्यानंतर त्याच्या नेतृत्वामध्ये सकारात्मक बदल झालेला मला पाहायला मिळाला आहे. या कालावधीमध्ये तो बऱ्याच गोष्टी शिकला असून तो अधिक परिपक्व झाला आहे,’ असे शास्त्री म्हणाले.

राहुलचा सराव

कोलंबो : काही दिवसांपूर्वी तापामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला भारताचा फलंदाज लोकेश राहुल आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून त्याने सोमवारी नेट्समध्ये सरावही केला. आजारपणामुळे राहुलला पहिल्या कसोटी सामन्याला मुकावे लागले होते. पण आता दुसऱ्या सामन्यासाठी तो सज्ज झाला आहे.‘सध्याच्या घडीला राहुलची स्थिती चांगली आहे. गेले २-३ दिवस तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. पण दिवसेंदिवस त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी त्याच्या नावाचा विचार नक्कीच केला जाईल,’ असे शास्त्री यांनी सांगितले.