Ravi Shastri on India Next T20I Captain: भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची कामगिरी प्रभावी राहिली आहे. आपल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात त्याने एकही द्विपक्षीय मालिका गमावलेली नाही. याशिवाय आशिया चषकही जिंकून दिली. महत्त्वाचं म्हणजे सूर्याच्या नेतृत्त्वाखाली भारताने सलग दुसरा टी-२० विश्वचषक पटकावला आणि इतिहास घडवला. कर्णधार म्हणून त्याची कामगिरी उत्कृष्ट असली तरी, त्याची फलंदाजीची सरासरी २५ च्या खाली घसरली आहे, जी त्याच्या मानकांनुसार खूपच कमी आहे. आता सूर्याच्या जागी भविष्यातील टी-२० कर्णधार कोण असणार, याची भविष्यवाणी रवी शास्त्रींनी केली आहे.
गेल्या वर्षभरात २०२५ मध्ये सूर्यादादाच्या बॅटमधून अपेक्षित अशी कामगिरी पाहायला मिळालेली नाही. तर २०२६ मध्ये टी-२० विश्वचषकातही काही सामने वगळता सूर्या मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला होता. दरम्यान यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी त्याचा सध्याचा फॉर्मही निराशाजनक राहिला आहे, ज्यामुळे नजीकच्या काळात भारतीय टी-२० संघाचा कर्णधार बदलू शकतो अशी चर्चा सुरू आहे.
रवी शास्त्रींच्या मते, जर निवडकर्ते एखाद्या प्रबळ दावेदाराच्या शोधात असतील, तर राजस्थान रॉयल्सचं नेतृत्त्व केलेल्या आणि कर्णधारपदाच्या अनुभवामुळे संजू सॅमसन आघाडीवर असायला हवा. ‘आयसीसी रिव्ह्यू’ या कार्यक्रमात प्रसिद्ध क्रीडा निवेदिका संजना गणेशन यांच्याशी बोलताना रवी शास्त्री म्हणाले, “२०२८ मध्ये होणाऱ्या पुढील टी२० विश्वचषकापर्यंत भारताला नवीन कर्णधाराच्या शोधात असणार आहे. अर्थात हे सूर्या पुढील काही वर्षांत कशी कामगिरी करतो यावर अवलंबून असेल.”
रवी शास्त्री पुढे म्हणाले, “पण संजू सॅमसनने यापूर्वी राजस्थानचं नेतृत्त्व केल्यामुळे, तो या पदासाठी एक प्रबळ दावेदार म्हणून सिद्ध झाला आहे. फलंदाजीच्या वरच्या फळीत त्याचं स्थान पक्क आहे आणि तो एक अत्यंत आक्रमक फलंदाज आहे. त्यामुळे, पुढील दोन-तीन वर्षांत संजूसाठी आणखी मोठ्या गोष्टींची ही केवळ सुरुवात आहे, असं मला वाटतं.”
टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत अनेक मॅचविनिं खेळींमुळे सॅमसनला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणून गौरविण्यात आलं. सूर्यकुमारप्रमाणेच हा यष्टीरक्षक-फलंदाज सध्या आयपीएलमध्ये खेळत आहे. भारताचा पुढील टी-२० आंतरराष्ट्रीय दौरा आयर्लंडमध्ये होणार असून, तिथे ते यजमान संघाविरुद्ध दोन सामन्यांची मालिका खेळतील.
संजू सॅमसनने आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यांमध्ये ५०.०० च्या सरासरीने आणि १६४.२३ च्या स्ट्राइक रेटने ४५० धावा केल्या असून, तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अव्वल १० खेळाडूंमध्ये आहे. २०२६ च्या हंगामात त्याने दोन शतकं आणि एक अर्धशतक झळकावलं आहे.
