रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीने देखील सर्वांना धक्का देत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विराट कोहलीच्या निवृत्तीवरून अजूनही मोठी चर्चा सुरू आहे. विराटच्या निवृत्तीमागचं कारण काय असेल याचे अनेक दावे करणारे रिपोर्ट आपल्या समोर येत आहे. दरम्यान एका रिपोर्टमध्ये असं म्हटलं होतं की, विराट कोहलीने कसोटी निवृत्तीपूर्वी भारताचे माजी कोच रवी शास्त्री यांच्याशी चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं होतं, याबाबत रवी शास्त्रींनी माहिती दिली आहे.
विराट कोहलीने १२ मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहून निवृत्तीची घोषणा केली. कोहली कसोटी क्रिकेट तसेच जागतिक क्रिकेटमधील मोठं नाव आहे. अनेकांनी विराटच्या निवृत्तीबाबत आश्चर्य व्यक्त केलं. कोहली आणि शास्त्री हे भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार-प्रशिक्षक जोडी ठरले होते. शास्त्री यांनी सांगितलं की विराटने निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी त्यांच्याशी चर्चा केली होती.
रवी शास्त्री यांनी विराटच्या निवृत्तीबद्दल बोलताना आयसीसी रिव्ह्यूमध्ये संजना गणेशनला सांगितले की, “मी याबद्दल विराटशी बोललो होतो, मला वाटतं निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी एक आठवडा आधी आम्ही चर्चा केली होती. त्याच्या मनात हे अगदी स्पष्ट होतं की त्याने कसोटी क्रिकेट खेळताना आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं.”
“विराटला कोणत्याही गोष्टीचा आता पश्चात्ताप नाही. मी त्याला एक दोन प्रश्न विचारले, जे अगदी वैयक्तिक प्रश्न होते आणि त्याने स्पष्टपणे मला सांगितलं की त्याच्या मनात कोणतीही शंका नाही. त्यामुळे मलाही जाणवलं की हीच वेळ योग्य आहे. त्याच्या मनाने त्याला शरीराला सांगितलं होतं की आता कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याची वेळ आली आहे.”
विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्यांनी ६८ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्त्व केले आहे, त्यापैकी ४० कसोटी सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला. कोहली मैदानावर त्याच्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो आणि शास्त्रींच्या मते अशा विचारसणीची माणसं मर्यादित काळासाठी असतात.
शास्त्री पुढे म्हणाले, “जर त्याने एखादी गोष्ट करायची ठरवली की तो आपलं १०० टक्के देतो आणि ज्यावर मात करणं सोप नसतं. एखादा खेळाडू आपले काम करून बसतो, पण जेव्हा संघ मैदानावर असतो तेव्हा कोहलीला सर्व विकेट घ्यायच्या असतात. त्याला सगळे कॅच झेलायचे असतात. त्याला मैदानावर सर्व निर्णय स्वतः घ्यायचे असतात, इतका का तो प्रत्येक गोष्टीत सामील होतो. मला वाटतं जर त्याने विश्रांती घेतली नाही तर तो बर्नआउट होऊ लागतो. जर त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये कसं खेळायचं हे ठरवलं नाही, तर बर्नआउट होणं साहजिक आहे.”
विराटच्या कसोटी निवृत्तीपूर्वी चर्चा करूनही त्याच्या निवृत्तीचा मेसेज पाहून रवी शास्त्रींना धक्का बसला होता. याबद्दल बोलताना शास्त्री म्हणाले, “विराटने निवृत्तीची घोषणा करताच मला धक्का बसला होता. कारण, विराट अजून २-३ वर्ष कसोटी क्रिकेट खेळू शकला असता.”
“पण जेव्हा तुम्ही मानसिकरित्या गोंधळता आणि खचता तेव्हा शरीराला ते याबद्दल संकेत देतं. तुम्ही कदाचित शारिरीकरित्या फिट आहात, संघातील इतर खेळाडूंपेक्षाही फिट आहात पण मानिसकरित्या जर तुम्ही थकला असाल तर तुमच्या शरीराला ते संकेत देतं की बस्स आता थांबण्याची गरज आहे”, असं शास्त्री म्हणाले.