कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा आत्मा आहे असं म्हटलं जातं. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूचा खरा कस लागतो. त्यामुळे कसोटी क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. कसोटी क्रिकेटला प्रेक्षकवर्ग मिळावा यासाठी दिवस-रात्र कसोटी सामन्यांचा प्रयोग करण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, पण आता क्रिकेटची सर्वोच्च परिषद असलेली ICC कसोटी क्रिकेट सामन्यांचा कालावधी कमी करण्याचा विचार करत आहे. यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत असून त्यात आता भारताचे प्रशिक्षक रवि शास्त्री यांनीही सूर मिसळला आहे.

Video : बाबोsss…… २४ तासांत झाल्या ३ हॅट्रटिक

काय म्हणाले रवि शास्त्री

चार दिवसाच्या कसोटी क्रिकेटचा प्रस्ताव म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. हे असंच सुरू राहिलं तर काही दिवसांनी आपल्यावर निर्धारित षटकांचे कसोटी सामने खेळावे लागतील. पाच दिवसांच्या कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये काहीही बदल करण्याची गरज नाही. जप बदल करायचाच असेल, तर क्रमवारीतील अव्वल ६ संघांना पाच दिवसाचे कसोटी क्रिकेट खेळू द्या आणि त्यानंतरच्या संघांना चार दिवसाचे कसोटी क्रिकेट खेळू द्या. कसोटी क्रिकेट टिकवायचे असेल तर अव्वल सहा संघांना एकमेकांविरोधात जास्तीत जास्त कसोटी सामने खेळू द्या”, असे रोखठोक मत रवि शास्त्री यांनी व्यक्त केले.

T20 World Cup 2020 : धोनीला स्थान नाही; शुभमन गिल संघात

गौतम गंभीरनेही केला विरोध

गौतम गंभीरने आपल्या स्तंभात चार दिवसाच्या कसोटी सामन्याच्या कल्पनेबद्दल रोखठोक मत व्यक्त केले आहे. “चार दिवसाच्या कसोटी सामन्याची कल्पना हे अत्यंत मूर्खपणाचे आहे. ही कल्पना अजिबात अंमलात आणली जाऊ नये. ही कल्पना म्हणजे अनिर्णित सामन्यांना निमंत्रण असेल. फिरकीपटूंना स्वत:ला सिद्ध करण्याची पुरेशी संधी मिळणार नाही. त्यामुळे कसोटी क्रिकेटची मजा कमी होईल. अशा कल्पनांपेक्षा खेळाडू आणि खेळपट्टीचा दर्जा याकडे लक्ष देण्याची गरज आहे”, असे गंभीरने नमूद केले.

संदीप पाटीलही या कल्पनेच्या विरोधात

“पाच दिवसीय कसोटी क्रिकेट हेच उत्तम आहे असा मला दृढ विश्वास आहे. माझ्या मते (चार दिवसीय कसोटी क्रिकेट) कल्पनेचा काहीही उपयोग नाही. कसोटी क्रिकेट चार दिवसाचे करण्यात मला तरी काही आर्थिक फायदा किंवा तोटा दिसत नाही. कसोटी क्रिकेट हे सध्या प्रचंड तोट्यात आहे. ३० वर्षाच्या कालावधीत खूप काही बदललं आहे. कसोटी क्रिकेट जगवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. त्यामुळे आता कोणताही बदल करताना ती गोष्ट कसोटी क्रिकेटला पुढे घेऊन जाणारी आहे का हे ICC ने पाहायला हवा”, असे मत त्यांनी व्यक्त केले.

इंग्लंडचा स्टार क्रिकेटपटू म्हणतो…

“दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा आमचा सामना अत्यंत चुरशीचा झाला. या सामन्याचा निकाल पाचव्या दिवशीच्या खेळाच्या तिसऱ्या सत्रात लागला. याच कारणामुळे मला वाटतं की कसोटी क्रिकेट हे पाच दिवसाचंच असायला हवं. कारण पाच दिवसीय कसोटी हा क्रिकेटचा सर्वोत्तम स्पर्धात्मक प्रकार आहे”, असे बेन स्टोक्सने स्पष्ट केले.

IND vs AUS : भारताला भारतातच हरवू – अ‍ॅरोन फिंच

कोण-कोण विरोधात?

ICC चार दिवसाचा कसोटी सामना करण्याचा प्रस्ताव चर्चेला आणणार आहे. सध्या क्रिकेटमधील जुने-जाणते तज्ञ्ज तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंकेतील माजी फिरकीपटू या कल्पनेच्या विरोधात आहेत. त्यामुळे या प्रकारावर फारसा सकारात्मक प्रतिसाद दिसलेला नाही.

काय आहे प्रस्ताव?

कसोटी सामना चार दिवसांचा करण्याच्या नियमाची अंमलबजावणी २०२३ पासून होण्याची शक्यता आहे. २०२३ ते २०३१ या कालावधीत होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी हा नियम राबवला जाण्याची शक्यता आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. याबाबत विचारविनिमय सुरु असून तज्ज्ञांकडून मत मागवली जात आहेत.