Ravi Shastri on Abhishek Sharma: सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये टीम इंडियाच्या अभिषेक शर्मावर सर्वांच्या नजरा होत्या. पण अभिषेक शर्मा खेळलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये शून्यावर बाद झाला आहे. त्यामुळे सध्या अभिषेक शर्माचा फॉर्म हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अभिषेक शर्माच्या जागी आता सुपर-८ सामन्यांमध्ये संजू सॅमसनला संधी मिळणार का अशी चर्चादेखील सुरू आहे. पण यादरम्यान भारताचे माजी खेळाडू व कोच रवि शास्त्री यांच्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात अभिषेक गोल्डन डकवर बाद झाला. प्रकृती बिघडल्याने तो नामिबियाविरुद्धचा पुढील सामना खेळू शकला नव्हका. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात तो संघात परतला, मात्र पुन्हा खातं न उघडता माघारी परतला. नेदरलँड्सविरुद्धही तो शून्यावर बाद झाला. संघातील महत्त्वाचा खेळाडू असल्याने चाहत्यांना त्याच्या फॉर्मची चिंता वाटू लागली आहे. मात्र रवी शास्त्री यांनी अभिषेकचा हा संघर्ष सकारात्मक दृष्टीने पाहत, “त्याने अजून धावा केल्या नाहीत, हीच गोष्ट प्रतिस्पर्धी संघांसाठी चिंतेची बाब ठरेल,” असं मत व्यक्त केलं.

रवि शास्त्री अभिषेक शर्माबाबत काय म्हणाले?

आयसीसीशी बोलताना भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले, “मला वाटतं भारतासाठी सकारात्मक बाब म्हणजे प्रत्येक सामन्यात कुणीतरी जबाबदारी उचलली आहे. कधी इशान किशन, तर पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव पुढे आला. तिलक वर्मानेही आपली भूमिका चोख बजावली आहे. त्याला चांगली सुरुवात मिळाली आहे, पण त्याची सर्वोत्तम कामगिरी अजून बाकी आहे असं मला वाटतं. अभिषेक शर्माच्या नावे तीन शून्य आहेत, याकडे मी सकारात्मकतेने पाहतो. मोठ्या सामन्यांसाठी आपली सर्वोत्तम कामगिरी त्याने राखून ठेवली आहे. त्याने अद्याप धावा केल्या नाहीत, त्यामुळे विरोधी संघ नक्कीच सावध असतील.”

संघ व्यवस्थापनाचा अभिषेकवर पूर्ण विश्वास आहे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर-८ सामन्यात तो खेळण्याची शक्यता आहे. माध्यमांशी बोलताना सूर्यकुमार यादवने अभिषेकच्या सलग तीन ‘डक’बाबत भाष्य करत तो प्लेईंग इलेव्हनमध्ये कायम राहील, याची पुष्टी केली. “अभिषेक शर्माच्या फॉर्मची ज्यांना चिंता आहे, त्यांचीच मला चिंता वाटते. त्याच्या फॉर्मबद्दल एवढी काळजी का करता? मला तर आता त्याच्याविरुद्ध खेळणाऱ्या संघांची जास्त चिंता वाटते, कारण त्याने अजून धावा केलेल्या नाहीत,” असं कॅप्टन म्हणाला.

दरम्यान, इशान किशनने फलंदाजीची जबाबदारी समर्थपणे पार पाडत चार सामन्यांत १७६ धावा केल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या आयसीसी स्पर्धेत तो भारताचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवनेही पुढाकार घेत १६२ धावा केल्या आहेत. अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कॅप्टनने भारताला संकटातून बाहेर काढत ४९ चेंडूंमध्ये नाबाद ८४ धावांची दमदार खेळी साकारली आणि संघाला १६१ धावांपर्यंत पोहोचवलं.

कर्णधार म्हणूनही सूर्याने उत्कृष्ट कामगिरी केली असून गतविजेत्या भारताने अद्याप एकही सामना गमावलेला नाही. चारही सामने जिंकत भारताने गट टप्प्यातील गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं. आता सुपर-८ फेरीसाठी संघ तयारीनिशी उतरणार आहे.