Ravi Shastri Statement on India Defeat: टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीत दक्षिण आफ्रिकेकडून भारतीय संघाला दारूण पराभव पत्करावा लागला. या पराभवाचा भारताच्या नेट रन रेटवर मोठा परिणाम झाला असून उपांत्य फेरीच्या आशांवर पाणी फेरणार का, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यादरम्यान आता भारताचे माजी प्रशिक्षक व खेळाडू असलेल्या रवी शास्त्रींच्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सुपर ८ फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या ७६ धावांच्या पराभवावर स्पष्ट आणि परखड मत व्यक्त केलं. हा पराभव टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील भारताचा सर्वात मोठा पराभव ठरला. मात्र, शास्त्री यांच्या मते, गतविजेत्या भारताला हा धक्का आवश्यक होता आणि संघाच्या उपांत्य फेरीच्या आशा अजूनही कायम आहेत.

‘द आयसीसी रिव्ह्यू’ या कार्यक्रमात बोलताना शास्त्री म्हणाले की, स्पर्धेच्या सुरुवातीलाच हा धक्का बसणं भारतासाठी चांगले ठरू शकतं. त्यामुळे उर्वरित दोन सुपर ८ सामने चेन्नईत झिम्बाब्वेविरुद्ध आणि १ मार्च रोजी कोलकात्यात वेस्ट इंडिजविरुद्ध यापूर्वी संघाला आपल्या रणनितीचा आणि संघरचनेचा पुनर्विचार करण्याची संधी मिळेल.

रवी शास्त्रींचं भारताच्या सुपर-८ मधील पराभवानंतर मोठं वक्तव्य

“संघाचा असा पराभव लवकर झाला, याचा मला आनंद आहे. विशेषतः अशा संघाविरुद्ध जो उपांत्य फेरीसाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. कदाचित भारताला अशाच धक्क्याची गरज होती. यामुळे संघाला पुढील रणनीती आणि संघरचना नव्याने ठरवावी लागेल. मला खात्री आहे की भारत जोरदार पुनरागमन करेल. या अनुभवातून त्यांनी धडा घेतला असेल आणि गोष्टी गृहीत धरणार नाहीत. सुपर-८ मध्ये आणखी एक सामना गमावला, तर दबाव प्रचंड वाढेल,” असं शास्त्री म्हणाले.

टीम इंडियाच्या संघ रचनेबाबत शास्त्री काय म्हणाले?

अक्षर पटेलच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी दिल्याने मोठी टीका होत आहे. यावरून संघरचनेबाबत शास्त्री म्हणाले, “माझ्या मते त्याला पुन्हा प्लेईंग इलेव्हनमध्ये घ्यायलाच हवे. अनुभवाची गरज असते. शक्य असल्यास दोघांनाही खेळवा आणि स्वतःकडे एक अतिरिक्त पर्याय ठेवा. कारण कोणत्याही दिवशी एखाद्या गोलंदाजाचा दिवस खराब जाऊ शकतो. उदाहरणार्थ, काल वरूण चक्रवर्ती त्याच्या सर्वोत्तम लयीत नव्हता आणि त्याची किंमत मोजावी लागली. त्यामुळे बॅकअप असणं आवश्यक आहे.”

“यामुळे तुमचा संघातील आठवा क्रमांक मजबूत होतो. जर अक्षर पटेल खेळत असेल तर तो आठव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. तुमच्याकडे पाचव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या, सहाव्या क्रमांकावर शिवम दुबे, सातव्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदर आणि आठव्या क्रमांकावर अक्षर असे पर्याय असतील. गरज पडल्यास अक्षर पाचव्या क्रमांकावरही फलंदाजी करू शकतो,” असं रवी शास्त्रींनी सांगितलं.

शास्त्री यांनी संघाच्या फलंदाजीची ताकद अधोरेखित करताना म्हटलं, “टी-२० क्रिकेटमध्ये आठ फलंदाज मिळूनही जर सामना जिंकता आला नाही, तर कुठेतरी चूक आहे, विशेषतः एवढ्या फायरपॉवरसह. खरा प्रश्न अतिरिक्त गोलंदाजी पर्याय न ठेवण्यात आहे आणि तो महत्त्वाचा ठरतो. कदाचित यासाठी रिंकू सिंगला बाहेर बसावे लागेल; पण तो खेळणार असेल, तर एखाद्या तज्ज्ञ फलंदाजाच्या जागीच यायला हवा,” असं त्यांनी स्पष्ट केलं.