ज्येष्ठ माजी क्रिकेटपटू आणि नामवंत समालोचक यांच्या गोंधळामुळे रविवारी अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकला तेव्हा धड कोणाला कळलंच नाही. शास्त्री यांची समजण्यात चूक झाली आणि यामुळे टीव्हीवर सामना पाहणारे चाहते गोंधळले.
दोन षटकं बाकी असताना कर्णधार सूर्यकुमार यादवने कामचलाऊ फिरकीपटू अभिषेक शर्माला गोलंदाजी दिली. अभिषेकने लॉकी फर्ग्युसनला बाद केलं आणि टीम इंडियाने जेतेपदावर कब्जा केला. सीमारेषेनजीक तिलक वर्माने रिले पद्धतीने त्याचा झेल टिपला. तिलकने झेल नीट टिपला होता त्यामुळे पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्याचा प्रश्नच नव्हता. या विकेटवेळी शास्त्री म्हणाले, नववी विकेट पडली आहे. ही नववी नव्हे तर दहावी विकेट आहे हे त्यांना तात्काळ लक्षात आलं. ते लगेचच म्हणाले, नववी नव्हे दहावी विकेट आणि टीम इंडियाने तिसऱ्यांदा टी२० वर्ल्डकप पटकावला आहे. लागोपाठ दोन टी२० वर्ल्डकप जिंकणारा पहिलाच संघ आणि घरच्या मैदानावर वर्ल्डकप जिंकणाराही पहिलाच संघ. भारतीय संघासाठी स्पर्धेतली कामगिरी अफलातून अशीच होती. शास्त्री यांनी तातडीने वेळ सावरून नेली असली तरी शेवटच्या विकेटनंतर वर्णन,आवाजातला उत्साह हे सगळंच निसटलं.
वर्ल्डकप जिंकल्यानंतर वातावरण भारून टाकणारं असतं. भारतीय खेळाडूंनाही न्यूझीलंडच्या विकेट्स इतक्या झटपट मिळतील याची अपेक्षा नव्हती. त्यातच रवी शास्त्री यांच्या गोंधळामुळे चाहत्यांना क्षणभर काय झालं ते कळेना. ज्यांना दहाव्या विकेटबद्दल खात्री होती त्यांनी जल्लोष करायला सुरुवात केली मात्र शास्त्री नववी विकेट म्हणाल्यामुळे अनेकांनी सेलिब्रेशन थांबवल. मात्र काही मिनिटात शास्त्री यांनी खुलास करताच उत्साहाला उधाण आलं.
न्यूझीलंडचा संघ सर्वबाद होईल अशी अपेक्षा नव्हती. जसप्रीत बुमराहने झटपट विकेट पटकावत न्यूझीलंडच्या डावाला खिंडार पाडलं.
भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री हे समालोचन विश्वातलं मोठं नाव. भारदस्त आवाज, अमोघ वक्तृत्व, खेळाचा सखोल अभ्यास यामुळे मोठ्या सामन्यांसाठी, नाणेफेकीसाठी रवी शास्त्री यांनाच पाचारण केलं जातं. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात २०११ मध्ये भारताने विश्वविजेतेपद पटकावलं तेव्हा रवी शास्त्री यांचे शब्द आजही चाहत्यांच्या कानात गुंजतात. नुवान कुलसेकराच्या गोलंदाजीवर षटकार खेचत धोनीने विजयावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यावेळी शास्त्री म्हणाले होते- Dhoni finishes off in style, india lifts the world cup & the party begins in the dressing room. त्या क्षणाचं एवढं सुरेख वर्णन अन्य कोणाला जमणं अवघड.
रविवारी शेवटच्या षटकांमध्ये शास्त्री असल्यामुळे अशा स्वरुपाचं वर्णन ऐकायला मिळेल अशी क्रिकेटरसिकांना अपेक्षा होती मात्र झालं भलतंच. शास्त्री यांचा विकेट कुठली याचा अंदाज चुकल्याने पुढचं सगळं गडबडलं. टीम इंडियाने जेतेपद पटकावलं तो क्षणच नीट व्यक्त होऊ शकला नाही. चाहत्यांनी सोशल मीडियावर या प्रसंगाचा व्हीडिओ शेअर करत शास्त्री यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान स्पर्धेत दमदार फॉर्मात असलेल्या भारतीय संघाने फायनलच्या मुकाबल्यात प्रथम फलंदाजी करताना २५५ धावांचा डोंगर उभारला. संजू सॅमसनने ४६ चेंडूत ८९ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. अभिषेक शर्माने २१ चेंडूत ५२ तर इशान किशनने २५ चेंडूत ५४ धावांची खेळी करत संजूला चांगली साथ दिली. शिवम दुबेने ८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद २६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या धावसंख्येसह भारतीय संघाने विजयाचा पाया रचला होता. प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. टीम सैफर्ट (५२) आणि मिचेल सँटनर (४३) यांचा अपवाद वगळता न्यूझीलंडच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. जसप्रीत बुमराहने १५ चेंडूत ४ तर अक्षर पटेलने २७ धावांत ३ विकेट्स पटकावल्या. बुमराहला सामनावीर तर सलग तीन लढतीत अर्धशतकी खेळी साकारणाऱ्या संजू सॅमसनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. भारतीय संघाचं आयसीसी स्पर्धेचं हे आठवं जेतेपद आहे.
