नवी दिल्ली : भारतीय संघाला २०१३च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेनंतर ‘आयसीसी’ची एकही जागतिक स्पर्धा जिंकता आलेली नाही. दरम्यानच्या काळात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले. त्यामुळे त्यांना बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागले आहे. मात्र, या दोघांबाबत संयम बाळगण्याचे आवाहन फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने चाहत्यांना केले आहे.
‘‘सचिन तेंडुलकर १९९२, १९९६, १९९९, २००३ आणि २००७ सालच्या विश्वचषकांमध्ये खेळले होते. मात्र, त्यांनी पहिल्यांदा विश्वचषक २०११मध्ये जिंकला,’’ असे अश्विन म्हणाला.
‘‘रोहित आणि विराट २००७च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळले नव्हते. विराटने ‘आयसीसी’ची स्पर्धा जिंकलेली नाही असे कायम म्हटले जाते. मात्र, २०११चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघात विराटचा समावेश होता. रोहितही २०१३च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत खेळला होता. त्यामुळे आपण त्यांना वेळ दिला पाहिजे. त्यांच्याबाबत संयम बाळगला पाहिजे. ‘आयसीसी’च्या स्पर्धा जिंकण्यासाठी मोक्याचे क्षण, महत्त्वाचे निर्णय तुमच्या बाजूने जाणे गरजेचे असते,’’ असे अश्विनने नमूद केले.