मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने न्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव केला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात धावांच्या फरकाने भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. याआधी सर्वात मोठा विजय ३३७ धावांचा होता, जो २१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळाला होता. या विजयासह भारताने न्यूझीलंडविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका १-० अशी जिंकली आहे. यापूर्वी कानपूरमध्ये खेळवण्यात आलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता. भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. अश्विनने मुंबई कसोटीत अनेक विक्रम आपल्या झोळीत टाकले.

एका कॅलेंडर वर्षात जास्त विकेट

सिंह कधीच म्हातारा होत नाही, हे अश्विनने आपल्या कामगिरीने सिद्ध केले आहे. त्याने आपल्या अलीकडच्या कामगिरीने प्रत्येक भारतीय चाहत्याची मने जिंकली आहेत. २०२१चे कॅलेंडर वर्ष अश्विनसाठी खूप चांगले होते, त्याने या वर्षी सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली आणि अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग या त्याच्या वरिष्ठ खेळाडूंचे रेकॉर्ड मागे टाकले. अश्विनने चालू कॅलेंडर वर्षात आतापर्यंत ५२ विकेट घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अश्विनला कसोटी खेळण्याची संधी मिळाली, तर हा आकडा आणखी वाढू शकतो.

रवीचंद्रन अश्विनच्या कारकिर्दीतील ही चौथी वेळ आहे, जेव्हा त्याने एका कॅलेंडर वर्षात ५० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी अश्विनशिवाय प्रत्येकी ३ वेळा अनिल कुंबळे आणि हरभजन सिंगने असा करिष्मा केला आहे. त्याचबरोबर टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी एका वर्षात दोनदा ५०हून अधिक विकेट घेतल्या आहेत.

हॅडली यांना सोडले मागे

अश्विनने महान किवी गोलंदाज सर रिचर्ड हॅडली यांचाही विक्रमही मोडला. अश्निन आता भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स (६६) घेणारा गोलंदाज बनला आहे. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या १४ सामन्यांमध्ये हेडली यांनी ६५ बळी घेतले होते.

हेही वाचा – IND vs NZ : बदल्याचं अग्निकुडं थंडावलं..! भारतानं न्यूझीलंडला हरवत जिकलं ‘मोठं’ बक्षीस; तुम्हालाही वाटेल अभिमान!

वानखेडेवर पराक्रम

रवीचंद्रन अश्विनने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सर्वाधिक विकेट घेण्यात अनिल कुंबळेच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या मैदानावर कुंबळे आणि अश्विनने ३८ विकेट घेतल्या. या दोघांनंतर कपिल देव यांनी वानखेडेवर २८ विकेट घेतल्या आहेत.

३०० बळी

मुंबई कसोटीदरम्यान रवीचंद्रन अश्विनने आणखी एक करिष्मा केला. भारतीय भूमीवर ३०० बळी पूर्ण करणारा तो आता दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अनिल कुंबळेने हा करिष्मा केला होता. कुंबळेच्या नावावर भारतीय मैदानांवर ६३ सामन्यांत ३५० विकेट्स घेतल्या असून तो अव्वल स्थानावर आहे.