Ravichandran Ashwin joins CSK Group : आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त, भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनची अलीकडच्या काळात आयपीएलमध्येही उत्कृष्ट कामगिरी राहिली आहे. त्याने राजस्थान रॉयल्ससाठी जबरदस्त गोलंदाजी केली आणि संघाच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले. अश्विन आतापर्यंत आयपीएलमध्ये ५ संघांसाठी खेळला आहे. त्याने २००८ ते २०१५ पर्यंत चेन्नई सुपर किंग्जची जर्सी परिधान केली होती. त्यानंतर तो वेगवेगळ्या संघांकडून खेळत राहिला. आता हा स्टार ऑफ स्पिनर पुन्हा एकदा सीएसकेच्या ग्रुपमध्ये सामील झाला आहे. सध्या अश्विन हा राजस्थान रॉयल्सचा खेळाडू - रविचंद्रन अश्विन सध्या राजस्थान रॉयल्सचा खेळाडू म्हणून सदस्य आहे. कारण संघाने त्याला अद्याप रिलीज केलेले नाही. दरम्यान, अश्विनला चेन्नई सुपर किंग्जकडून एक मोठी ऑफर मिळाली आहे, जी तो नाकारू शकला नाही. तो पुन्हा एकदा त्याच्या जुन्या टीमशी जोडला गेला आहे. मात्र, अश्विन अद्याप खेळाडूच्या भूमिकेत परतलेला नाही. संघाची मालकी असलेल्या इंडिया सिमेंट्स या कंपनीने त्याला नवी जबाबदारी दिली आहे. अश्विनने मिळाली नवी जबाबदारी - अश्विनकडे चेन्नई सुपर किंग्जचे हाय-परफॉर्मन्स सेंटर सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हे केंद्र आयपीएल २०२५ च्या हंगामाच्या सुरुवातीपर्यंत पूर्णपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे, अश्विन या सेंटरच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. तामिळनाडूमध्ये सीएसकेच्या अनेक अकादमी आहेत. मुख्य संघाव्यतिरिक्त, हाय-परफॉर्मन्स सेंटर अकादमीच्या खेळाडूंवरही लक्ष ठेवेल. हेही वाचा - T20 WC 2024 : पाकिस्तान क्रिकेट संघाने चाहत्यांकडून उकळले पैसे? खेळाडूंसह खाजगी डिनर करण्यासाठी एवढी रक्कम घेतल्याचा आरोप इंडिया सिमेंट्समध्ये परतल्यावर अश्विन म्हणाला, “खेळ पुढे नेणे आणि क्रिकेट जगतात योगदान देणे हे माझे प्राथमिक ध्येय आहे. ज्या ठिकाणी हे सर्व माझ्यासाठी सुरू झाले त्या ठिकाणी परत आल्याने मला खूप आनंद झाला आहे." सीएसकेचे सीईओ कासी विश्वनाथन देखील अश्विन पुन्हा एकदा सीएसकेशी जोडला गेल्यामुळे खूप खूश आहेत. अश्विनच्या पुनरागमनामुळे तो पुढच्या मोसमातही संघासाठी खेळू शकतो, अशा अटकळांना उधाण आले आहे. चेन्नईचा संघही त्याच्यासाठी बोली लावू शकतो. हेही वाचा - T20 WC 2024 : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडू सलामीच्या सामन्यातून बाहेर राजस्थान संघ अश्विनला रिटेन करणार? आयपीएल २०२५ च्या हंगामापूर्वी मोठा लिलाव होणार आहे. रिटेनशन अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु फ्रँचायझीला जास्तीत जास्त ४ खेळाडूंनाच कायम ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे. असे झाल्यास राजस्थान रॉयल्सला अश्विनला कायम ठेवणे कठीण होईल. या गोलंदाजाने २०१० आणि २०११ मध्ये चेन्नई संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.