आयपीएलच्या धर्तीवर जगभरात सगळीकडे टी२० लीगचं पेव फुटलं आहे. दर महिन्याला एक लीग असं चित्र आहे. या चित्रात आणखी एका लीगची भर पडली आहे. विशेष म्हणजे या लीगमध्ये रवीचंद्रन अश्विन खेळाडू आणि मार्गदर्शक अशा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड या लीगमध्ये संघमालकाच्या भूमिकेत दिसतील.
युरोपातली पहिली टी२० लीग आहे का?
युरो टी२० स्लॅम ही स्पर्धा २०१९ मध्ये होणार होती. मात्र कोरोनामुळे ही लीग रद्द करण्यात आली. युरोपियन टी२० प्रीमिअर लीग २०२५ मध्येच सुरू होणार होती. मात्र गुंतवणूकदारांच्या शोधात असलेल्या लीगकर्त्यांनी लीगचं आयोजन एक वर्ष पुढे ढकललं. जून महिन्यात युरोटी२० बेल्जियम खेळवण्यात आली होती. मात्र त्या स्पर्धेत टी२० प्रकारातले जगभरातले अव्वल खेळाडू सहभागी झाले नव्हते. अमेरिका, कॅनडा या देशांमध्ये सुरू झालेल्या लीगप्रमाणे ही लीग नेदरलँड्समध्ये नवा प्रेक्षकवर्ग तयार करेल अशी संयोजकांना आशा आहे.
संघ कोणते आहेत?
अॅमस्टरडॅम फ्लेम्स, बेलफास्ट वोल्व्ह्ज, डब्लिन गार्डियन्स, एडिनबर्ग कॅस्टल रॉकर्स, ग्लासगो कॉसमिक, रॉटरडॅम डॉकर्स असे ६ संघ या नव्या लीगमध्ये असणार आहेत. राहुल द्रविड (डब्लिन), स्टीव वॉ (अॅमस्टरडॅम) आणि फाफ डू प्लेसिस (रॉटरडॅम) हे सहमालकाच्या भूमिकेत आहेत. एडिनबर्ग संघाच्या मालकांनी माघार घेतल्यामुळे संयोजकांसमोर आव्हान उभं राहिलं होतं. मात्र नवे गुंतवणूकदार उपलब्ध झाले आणि लीगच्या आयोजनाचा मार्ग सुकर झाला.
कर्णधार कोण आहेत?
मिचेल मार्शकडे अॅमस्टरडॅम संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. मात्र ऑस्ट्रेलियासाठी खेळायचं असल्याने त्याने माघार घेतली. त्याच्या अनुपस्थितीत स्कॉट एडवर्ड्स कर्णधार असेल. बेलफास्ट संघाची धुरा ग्लेन मॅक्सलवेलकडे आहे. रवीचंद्रन अश्विन डब्लिन संघाचा कर्णधार-मेन्टॉर असणार आहे. तामिळनाडू प्रीमिअर लीग स्पर्धेतही त्याने अशी दुहेरी भूमिका निभावली आहे. एडिनबर्ग संघाने न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरकडे कर्णधारपद सोपवलं आहे. फाफ डू प्लेसिस रॉटरडॅम संघाचा कर्णधार असेल. ग्लासगो संघाची कमान स्कॉटलंडच्या जॉर्ज मुन्सेकडे असणार आहे. मुन्से आणि एडवर्ड्स हे दोनच युरोपियन कर्णधार आहेत.
अश्विन दुखापतग्रस्त?
गुडघ्याच्या दुखापतीमुळे अश्विनला मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत बहुतांश सामने खेळता आले नाहीत. मात्र तो या दुखापतीतून सावरला आहे. चेन्नईत क्लब क्रिकेट खेळतो आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यापासून अश्विनची ही दुसरी लीग आहे.
अन्य भारतीय या स्पर्धेत खेळत आहेत का?
अॅमस्टरडॅम संघाने भारतीय संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेला करारबद्ध केलं आहे. अजिंक्यने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. निवृत्तीनंतर खेळण्याची त्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू विजय शंकर अश्विनच्या डब्लिन संघातून खेळताना दिसेल. लंका प्रीमिअर लीगमध्ये तो कँडी रॉयल्स संघासाठी खेळला होता. डब्लिन संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये विक्रम राठोड असतील. ग्लासगो संघाच्या बॉलिंग कोचपदी वरुण आरोन आहे.
मोठे विदेशी खेळाडू खेळणार आहेत?
तडाखेबंद फटकेबाजी प्रसिद्ध टीम डेव्हिड अॅमस्टरडॅम संघाकडून खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथही या संघाचा भाग असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर जगभरातील टी२० संघांकडून खेळणारा हेनरिच क्लासन अश्विनच्या संघाचा भाग असेल. अमेरिकेचा विकेटकीपर बॅट्समन अँड्रियस गौसकडे चाहत्यांचं लक्ष असेल. न्यूझीलंडचा भरवशाचा फलंदाज डॅरेल मिचेल तसंच सलामीवर डेव्हॉन कॉनवे, इंग्लंडचा अष्टपैलू ख्रिस जॉर्डन लीगमध्ये खेळताना दिसतील.
युरोपियन खेळाडूंपैकी कोणावर असेल लक्ष?
भारतीय वंशाच्या मात्र आयर्लंडकडून खेळणाऱ्या जय मुंद्राच्या कामगिरीकडे चाहत्यांचं लक्ष असेल. फटकेबाजीसाठी प्रसिद्ध मुन्से प्रमुख आकर्षण ठरू शकतो. बॅस डे लीड, इटलीची फिरकीपटू क्रिशान कलूगमागे शर्यतीत असतील. तिन्ही प्रकारात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलेला मात्र आता पोर्तुगालकडून खेळणारा मॉइझेस हेन्रिके या लीगमध्ये खेळणार आहे.
लीगचा फॉरमॅट कसा आहे?
सहा संघ एकमेकांशी दोनदा खेळतील. त्यामुळे ३० प्राथमिक फेरीचे सामने असतील. गटातील अव्वल संघ फायनलमध्ये आगेकूच करेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेल्या संघांमध्ये क्वालिफायर मुकाबला होईल. या लढतीतील विजयी संघ फायनलमध्ये दाखल झालेल्या संघाविरुद्ध फायनलमध्ये खेळेल.
किती ठिकाणी सामने होणार आहेत?
व्हूरबर्ग आणि डब्लिन या दोन ठिकाणी सामने होणार आहेत. पहिला टप्पा व्हूरबर्ग इथे तर उर्वरित सामने डब्लिन इथे रंगणार आहेत.
अंतिम अकरात किती विदेशी खेळाडू खेळू शकतात?
आयपीएलप्रमाणेच या लीगमध्येही अंतिम अकरात चारच विदेशी खेळाडू असू शकतात. या लीगमध्ये इम्पॅक्ट प्लेयरसारखा कोणताही नियम नाही.
ही लीग सुरू असताना अन्य कुठली लीग सुरू आहे का?
हो, कॅरेबियन प्रीमिअर लीग आणि या स्पर्धेच्या तारखा सारख्याच आहेत. फिन अॅलन, डोनाव्हन फरेरा यांच्यासह शदाब खान यांनी सीपीएलला प्राधान्य दिल्याने या लीगमध्ये खेळू शकणार नाहीत.
