Ravindra Jadeja historic record Galle Test: रवींद्र जडेजाने भारत आणि श्रीलंका यांच्यातील गॉल कसोटी सामन्यात महाविक्रम रचला आहे. रवींद्र जडेजाने या सामन्यात २ विकेट्स घेतल्या. पण दुसरी विकेट घेताच त्याने कसोटी इतिहासात आपलं नाव सोनेरी अक्षरांनी लिहिलं. टीम इंडियाच्या या दिग्गज अष्टपैलू खेळाडूने दिवसाच्या तिसऱ्या सत्रात केशरा नुवानथाला बाद करून अनेक महत्त्वाचे विक्रमच आपल्या नावावर केले नाहीत, तर भारतासाठी एक अभूतपूर्व विक्रमही प्रस्थापित केला असा टप्पा ज्यापर्यंत यापूर्वी इतर कोणत्याही भारतीयाला पोहोचता आले नव्हते.

गॉल कसोटीपूर्वी रवींद्र जडेजाच्या नावे कसोटीत ३४८ विकेट्स होत्या. जडेजाने श्रीलंकेचा कर्णधार धनंयज डि सिल्वाला झेलबाद करत ३४९वी विकेट मिळवली. यानंतर जडेजाने या डावात ६७व्या षटकात केशराला झेलबाद करत ३५०वी विकेट मिळवली. श्रीलंकेकडून पदार्पण करणाऱ्या केशरा नुवानथाला बाद करून जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये ३५० विकेट्सचा टप्पा गाठला. हा टप्पा गाठणारा जडेजा पहिलाच भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज ठरला आहे; याआधी कोणत्याही भारतीय डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने ३०० विकेट्सचा टप्पाही गाठलेला नाही.

भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांच्या यादीत त्यांच्यापाठोपाठ भारताचे माजी दिग्गज खेळाडू बिशन सिंग बेदी यांचा क्रमांक लागतो, ज्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण २६६ विकेट्स घेतल्या होत्या. तर जडेजा हा कसोटी क्रिकेटमध्ये ३५० विकेट्स घेणारा जगातील केवळ तिसराच डावखुरा फिरकी गोलंदाज ठरला आहे.

जडेजाने रंगना हेराथ आणि डॅनियल व्हेटोरी यांच्यासह या प्रतिष्ठित गटात स्थान मिळवलं आहे. डावखुऱ्या फिरकी गोलंदाजांमध्ये सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या रंगना हेराथच्या नावावर आहे ज्याने ४३३ विकेट्स घेतल्या तर व्हेटोरीने ३६२ विकेट्स घेतल्या होत्या. या यादीत जडेजा तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीतील पहिल्या पाच जणांमध्ये डेरेक अंडरवूड आणि तैजुल इस्लाम यांचाही समावेश आहे, ज्यांनी अनुक्रमे २९७ आणि २७१ विकेट्स आपल्या नावे केल्या होत्या.

कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे डावखुरे फिरकीपटू

रंगना हेरथ (श्रीलंका) – ४३३ विकेट्स
डॅनियल व्हेटोरी (न्यूझीलंड) – ३६२ विकेट्स
रवींद्र जडेजा (भारत) – ३५० विकेट्स
डेरेक अंडरवुड (इंग्लंड) – २९७ विकेट्स
तैजुल इस्लाम (बांगलादेश) – २७१ विकेट्स

३५० कसोटी विकेट्स घेणारा जडेजा पाचवा भारतीय गोलंदाज

३५० कसोटी विकेट्सचा टप्पा गाठणारा जडेजा भारताचा केवळ पाचवा गोलंदाज ठरला. त्याच्याआधी अनिल कुंबळे, रविचंद्रन अश्विन, कपिल देव आणि हरभजन सिंग यांनीच ही कामगिरी केली होती. भारतासाठी सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याचा विक्रम अनिल कुंबळे यांच्या नावावर आहे. कुंबळेंनी आपल्या कारकिर्दीत ६१९ विकेट्स घेतल्या. त्यानंतर रविचंद्रन अश्विनचा क्रमांक लागतो, ज्याने ५३७ विकेट्स आपल्या नावे केला होता. भारताचे विश्वचषक विजेते माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी ४३४ विकेट्स, तर हरभजन सिंगने ४१७ विकेट्स घेतल्या होत्या, आता या यादीत जडेजाचं नावही जोडलं गेलं आहे.