IPL 2026 Ravindra Jadeja Cried After Fans Chant video: राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करत आयपीएल २०२६ च्या मोहिमेला विजयाने सुरूवात केली आहे. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघांमध्ये आयपीएल इतिहासातील मोठी ट्रेड डील १९व्या हंगामापूर्वी पाहायला मिळाली होती. ज्यामध्ये रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन यांची अदलाबदली दोन्ही संघांमध्ये करण्यात आली. या ट्रेडनंतर दोन्ही संघांमध्येच पहिला सामना खेळवला गेला आणि या सामन्यादरम्यान सीएसकेच्या चाहत्यांचं प्रेम पाहून जडेजा भावुक झालेला पाहायला मिळालं.
रवींद्र जडेजाने या सामन्यात एका षटकात दोन विकेट्स घेत चेन्नई संघाला मोठे धक्के दिले. यानंतर जडेजाने बंदुक चालवत केलेल्या अनोख्या सेलिब्रेशनने सर्वांचं लक्ष वेधलं. जडेजाने सर्फराझ खान व शिवम दुबे या मोठ्या विकेट संघाला मिळवून दिल्या. जडेजाने या सामन्यात तीन षटकं टाकली. त्यानंतर जड्डू सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता.
जडेजा सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी जाताच सीएसकेचे चाहते जड्डू जड्डू अशा घोषणा देऊ लागले. चाहत्यांचं प्रेम पाहून जड्डू भारावला आणि त्याचे भावुक झालेला फोटो व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. जडेजाला चेन्नईने ट्रेड केल्याचं पाहून चाहत्यांनी सीएसकेला सुनावलं होतं. जर्सी बदलली तरी चेन्नईच्या चाहत्यांचं जड्डूवरचं प्रेम कमी झालं नाही. ‘जड्डू-जड्डू’च्या घोषणा ऐकून रवींद्र जडेजाला आपले अश्रू आवरता आले नाहीत.
जर्सी बदलली पण चाहत्यांचं प्रेम सारखंचं! जड्डू चाहत्यांचं प्रेम पाहून भर मैदानात रडला
रवींद्र जडेजा २०१२ मध्ये पहिल्यांदा चेन्नई सुपर किंग्समध्ये सामील झाला होता. तेव्हापासून (२०१६ आणि २०१७ चेन्नईवर बंदी होती वगळता) तो सलग चेन्नईकडून खेळत आहे. साधारण १२ वर्षांहून अधिक काळ तो या संघाचा अविभाज्य भाग राहिला आहे. एमएस धोनीनंतर चेन्नईच्या चाहत्यांचं सर्वाधिक प्रेम जडेजालाच मिळालं. २०१२ च्या लिलावात चेन्नईने त्याला तब्बल ९.७२ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं, जी त्यावेळची सर्वात मोठी बोली होती. तेव्हापासून जडेजाने आपल्या अष्टपैलू कामगिरीने चेन्नईला अनेक जेतेपदं जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. २०२३ आयपीएल फायनलमध्ये अखेरच्या षटकात उत्कृष्ट फटकेबाजी करत त्याने संघाला पाचवं जेतेपद मिळवून दिलं होतं.
आयपीएल २०२६ च्या रिटेंशन आणि ट्रेड विंडोमध्ये चेन्नई सुपर किंग्सने (CSK) एक अत्यंत अनपेक्षित पण धाडसी निर्णय घेतला. गेल्या १२ वर्षांपासून चेन्नईचा आधारस्तंभ असलेला रवींद्र जडेजा आणि राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन यांच्यात अदलाबदल (Trade) करण्यात आली. एमएस धोनीच्या निवृत्तीनंतर चेन्नईला एका खंबीर यष्टीरक्षक-फलंदाजाची आणि भविष्यातील कर्णधाराची गरज होती. संजू सॅमसनच्या रूपाने चेन्नईला तो चेहरा मिळाला, तर राजस्थानने आपल्या ताफ्यात पुन्हा एकदा त्यांच्या जुन्या ‘चॅम्पियन’ला सामील करून घेत आपली फिरकी फळी मजबूत केली.
