Shubman Gill, IND vs ENG: बर्मिंघमच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ५८७ धावांचा डोंगर उभारला आहे. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला सुरुवातीला मोठे धक्के बसले. पण त्यानंतर जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रुकने मिळून इंग्लंडचा डाव सांभाळला. यादरम्यान हॅरी ब्रुकला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती. पण झेल सुटला आणि चेंडू शुबमन गिलच्या डोक्याला जाऊन लागला.
तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरू असताना ३८ वे षटक टाकण्यासाठी रवींद्र जडेजा गोलंदाजीला आला. जडेजा गोलंदाजी करत असताना शुबमन गिल स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. या षटकातील दुसरा चेंडू टप्पा पडून बाहेर टर्न झाला. या चेंडूवर ब्रुकने कव्हरच्या दिशेने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटची कडा घेत स्लिपमध्ये गेला.
जडेजाने हा चेंडू ताशी ९४ किमी वेगाने टाकला होता. बॅटची कडा घेऊन हा चेंडू आणखी वेगाने आला. त्यामुळे गिलला चेंडूच्या गतीचा अंदाज आला नाही. गिलने झेल पकडण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या डोक्याला लागून सीमारेषेच्या दिशेने वेगाने गेला. त्यामुळे हॅरी ब्रुक बाद होता होता थोडक्यात बचावला. गिलच्या डोक्याला चेंडू लागल्यानंतर सामना काही मिनिटांसाठी थांबवण्यात आला. त्यानंतर फिजिओ आले, त्यांनी चेक केल्यानंतर सामन्याला पुन्हा सुरूवात झाली.
ब्रुक – स्मिथची भागीदारी
या सामन्यात धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला एकापाठोपाठ एक मोठे धक्के बसले. पहिल्या दिवशी आकाश दीपने तर दुसऱ्या दिवशी मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या लागोपाठ २ विकेट्स घेतल्या. जॅक क्रॉली, ओली पोप, जो रूट आणि बेन स्टोक्स स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर हॅरी ब्रुक आणि जेमी स्मिथने मिळून इंग्लंडचा डाव सावरला आहे.
दोघांनी मिळून १५० धावांची भागीदारी केली. यादरम्यान संघाची धावसंख्या २५० धावांच्या पार पोहोचली आहे. जेमी स्मिथने अवघ्या ८० चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केलं. हे इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमधील तिसरं सर्वात वेगवान शतक ठरलं आहे.