Ravindra Jadeja Gautam Gambhir Viral Video Update: भारत आणि श्रीलंका क्रिकेट इलेव्हन यांच्यात सध्या तीन दिवसांचा सराव सामना (वॉर्म-अप सामना) सुरू आहे. १५ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी श्रीलंकेतील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी हा सामना भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रभावी कामगिरी केली आहे. या सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवसातील एक क्षण सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे; यात रवींद्र जडेजाच्या एका मजेशीर कृतीमुळे गौतम गंभीरला आपलं हसू आवरता आलं नाही आणि त्याचा खळखळून हसतानाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

गौतम गंभीर अनेकदा नावाप्रमाणे गंभीरच दिसतात आणि क्वचित हसतो. मात्र, श्रीलंकेतील एका सराव सामन्यादरम्यान ड्रेसिंग रूममध्ये गौतमला त्याचं हसू आवरता आलं नाही. रवींद्र जडेजा आणि गौतम गंभीर बसून गप्पा मारत होते. त्यावेळी जडेजाने भारतीय फिरकीपटू कुलदीप यादवच्या गोलंदाजीची शैली (ॲक्शन) हुबेहूब करून दाखवली, गौतम गंभीरही अगदी निरखून पाहत होता. तितक्यात जडेजाची ॲक्शन आणि त्याची वाक्य ऐकून गौतम गंभीर जोरजोरात हसू लागले. तर गंभीरच्या बाजूला बसलेले फिरकी गोलंदाजी कोचदेखील जोरजोरात हसत होते. गौतम गंभीरचा मनमोकळेपणाने हसतानाचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

सराव सामन्यात श्रीलंका क्रिकेट इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ३६३ धावांची खेळी करत डाव घोषित केला. यानंतर प्रत्युत्तरात भारताची सुरूवात खराब झाली. यशस्वी जैस्वाल शून्यावर माघारी परतला. यानंतर केएल राहुल व देवदत्त पडिक्कल यांनी भारताचा डाव सावरला. राहुल व पडिक्कल यांनी ९६ धावांची भागीदारी रचली. केएल राहुल ४० धावा करत माघारी परतला. तर देवदत्त पडिक्कलने १२१ चेंडूत १८ चौकारांच्या मदतीने शतकी खेळी साकारली. इतर फलंदाजांना सरावाची संधी मिळावी यासाठी शतकानंतर देवदत्त पडिक्कलला रिटायर्ड आऊट करण्यात आलं.

यानंतर रवींद्र जडेजा व मानव सुतार यांनी ७६ धावांची भागीदारी साकारत संघाचा डाव पुढे नेला. रवींद्र जडेजाला ६३ धावांवर रिटायर्ड हर्ट करण्यात आलं. यानंतर मानव सुतार ९० चेंडूत ५ चौकार व एका षटकाराच्या मदतीने ४१ धावा करत बाद झाला. यानंतर मात्र ऋषभ पंत व ध्रुव जुरेल स्वस्तात बाद होत माघारी परतले. त्यानंतर सारांश जैन २२ धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. तर गुरनूर ब्रार दिवसाच्या अखेरच्या षटकात दणदणीत ४ षटकार खेचत झटपट ३६ धावांची खेळी केली. यासह भारताने दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस ६ बाद ३५७ धावा केल्या आहेत आणि आता भारत ६ धावांनी पिछाडीवर आहे.