Ravindra Jadeja Kiss CSK Logo Jersey: राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघांमध्ये आयपीएल इतिहासातील मोठा ट्रेड पार पडला होता. रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन या खेळाडूंची अदलाबदली करण्यात आली होती. यानंतर स्पर्धेतील पहिलाच सामना राजस्थान आणि चेन्नई यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानने ७ वितेट्सने विजय नोंदवला. या सामन्यादरम्यान रवींद्र जडेजाने २ विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली. पण याशिवाय तो मैदानावरच भावुक होत रडताना दिसला होता. ज्याचा व्हीडिओ व्हायरल झाला. तर सामन्यानंतरचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो सीएसकेच्या जर्सीवरील लोगोला किस करताना दिसत आहे.

RR vs CSK सामन्यादरम्यान, १३-१४ वर्षांनंतर सीएसके सोडून राजस्थानकडून खेळणाऱ्या रवींद्र जडेजावर सर्वांच्या नजरा होत्या. या सामन्यात जडेजाने दोन बळी घेत शानदार गोलंदाजी केली. त्याच्या ‘गन-शॉट’ सेलिब्रेशनचा व्हिडिओही व्हायरल झाला. मात्र, सामन्यानंतर सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले, ज्यात जडेजा उघडपणे सीएसकेबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त करताना दिसत होता.

सध्या राजस्थान रॉयल्स संघाचा भाग असलेल्या रवींद्र जडेजाच्या मनात सीएसकेसाठी एक विशेष स्थान आहे. चेन्नई सुपर किंग्सला पराभूत केल्यानंतर, रवींद्र जडेजाने असं काही केलं की जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलं आहे. तो त्याचा माजी सहकारी खलील अहमदसोबत बोलत असताना, त्याने खलीलच्या जर्सीवरील सीएसकेच्या लोगोला कस केलं. ज्याचा फोटो चर्चेचा विषय बनला आहे. जडेजाने लोगोला किस केल्यानंतर पुन्हा एकदा लोगोवरून हात फिरवला. यावरून हे स्पष्टपणे दिसून येतं की जडेजाचं सीएसकेवर अजूनही किती प्रेम आणि त्याच्या मनात आदर आहे.

रवींद्र जडेजाच्या कृतीने चाहते झाले भावुक

सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये रवींद्र जडेजा रडताना दिसत आहे. हा प्रसंग पॉवर प्लेनंतर घडला, जेव्हा जडेजा सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. त्याच्या मागे बसलेल्या चाहत्यांनी “सीएसके, सीएसके! जड्डू जड्डू” असा जयघोष सुरू केला. जडेजा आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकला नाही आणि त्याला रडू कोसळलं.

रवींद्र जडेजा गेली १३-१४ वर्षे चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग होता. आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी, फ्रँचायझीने राजस्थान रॉयल्ससोबत एक ट्रेड करून जडेजाच्या जागी संजू सॅमसनला संघात घेतलं.