Ravindra Jadeja Viral Video: आयपीएल २०२६ मधील गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यानंतरचा रविंद्र जडेजाचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. राजस्थान रॉयल्सच्या विजयानंतर हस्तांदोलनाच्या वेळी जडेजा रोबोटिक कुत्र्याला खांद्यावर टाकून घेऊन जाताना दिसला. जडेजाचा मस्ती करतानाचा हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील रोमांचक सामना झाल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू नेहमीप्रमाणे हस्तांदोलनासाठी रांगेत उभे होते. हस्तांदोलन करण्यासाठी येण्यापूर्वी जडेजाने अचानक त्या रोबोटिक कुत्र्याला उचलून आपल्या खांद्यावर घेतलं. त्याच्या या अनपेक्षित कृतीमुळे आसपासच्या खेळाडू आणि अधिकाऱ्यांमध्येही हशा पिकला आणि हा व्हीडिओही व्हायरल झाला.

सामना चुरशीचा झाला असला, तरी हा हटके आणि मजेशीर प्रसंगच सोशल मीडियावर अधिक चर्चेत राहिला. जडेजा रोबोटिक कुत्र्याला अगदी पाळीव प्राण्यासारखा सहज खांद्यावर घेऊन फिरताना दिसत आहे. जडेजाने रोबोटिक डॉगला आपल्या खांद्यावर घेताच त्याला ऑपरेट करणारा व्हीडिओग्राफर मात्र कासावीस झालेला दिसला. तो पूर्णवेळ जडेजाच्या मागे तो रोबॉटिक डॉग घेण्यासाठी फिरत होता.

आयपीएलमधील या रोबोटिक डॉगला चंपक असं खास नाव देण्यात आलं आहे. २०२५ मध्ये आणण्यात आलेला हा आयपीएलचा नवीन रोबोटिक डॉग ‘चंपक’ हा एक अत्याधुनिक चतुष्पाद प्राणी आहे, जो आयपीएल २०२५ हंगामात एक व्हायरल सेलिब्रिटी शुभंकर बनला. तो खेळाडू, चाहते आणि पंचांशी संवाद साधतो, नाणेफेकीसाठी नाणे घेऊन जाणं यांसारखी कामे करतो आणि 3डी किंवा स्थिर गिम्बल कॅमेऱ्याचा वापर करून मैदानाच्या पातळीवरील कॅमेरा शॉट्स घेतो.

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना खूपच रोमांचक झाला. यशस्वी जैस्वाल व वैभव सूर्यवंशीने चांगल्या सुरूवातीनंतर ध्रुव जुरेलच्या ७५ धावांच्या खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने २१० धावांचा डोंगर उभारला. यानंतर धावांचा पाठलाग करत असलेल्या गुजरातला साई सुदर्शनने ७३ धावांची खेळी करत चांगली सुरूवात करून दिली. पण रवी बिश्नोईने मात्र मधल्या षटकांमध्ये ४ विकेट्स घेऊन गुजरातला मोठे धक्के दिले. यानंतर राजस्थानच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली. अखेरच्या २ षटकांमध्ये जोफ्रा आर्चर व तुषार देशपांडे यांनी १४ धावांचा बचाव करत संघाला ६ विकेट्सने रोमांचक विजय मिळवून दिला.