Ravindra Jadeja, ICC ODI World Cup 2027: आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेचा थरार दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वेत रंगणार आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुबमन गिलने आगामी वर्ल्डकप स्पर्धेची तयारी देखील सुरू केली आहे. भारतीय टीम मॅनेजमेंट या स्पर्धेसाठी रोडमॅप तयार करत आहे. या स्पर्धेसाठी काही नवख्या खेळाडूंना संघात स्थान दिलं जाऊ शकतं. तर काही वरिष्ठ खेळाडूंना डच्चू दिला जाऊ शकतो. या यादीत भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या नावाचा देखील समावेश आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रवींद्र जडेजाला वर्ल्डकप संघात स्थान मिळणं तळ्यात मळ्यात आहे.
वर्तमान भारतीय संघात रवींद्र जडेजा हा सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२४ टी-२० वर्ल्डकप जिंकून देण्यात जडेजाने मोलाची भूमिका बजावली होती. पण गौतम गंभीर आणि शुबमन गिलला संघात युवा खेळाडू हवे आहेत. २०२७ मध्ये जडेजा ३८ वर्षांचा होईल. त्यामुळे वाढतं वय आणि फॉर्ममध्ये नसलेलं सातत्य हे त्याला संघाबाहेर करण्याचं प्रमुख कारण ठरू शकतं.
खेळाडूंच्या दुखापतीने वाढवलं टीम मॅनेजमेंटचं टेन्शन
गेल्या काही वर्षांत भारतीय संघाला दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. संघातील काही प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर झाले आहेत. हार्दिक पंड्या आणि नितीश कुमार रेड्डी दुखापतग्रस्त असल्याने वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूची जागा सध्या रिकामी आहे. या दोन्ही खेळाडूंना रिप्लेस करण्यासाठी कुठलाही खेळाडू उपलब्ध नाही. त्यामुळे हार्दिक पंड्या आणि नितीश कुमार रेड्डी हे दोघेही वर्ल्डकप २०२७ स्पर्धेसाठी फिट असणं महत्वाचं असणार आहे.
रवींद्र जडेजाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. ही स्पर्धा झाल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मासह रवींद्र जडेजाने देखील टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. सध्या तो वनडे आणि कसोटी संघाचा भाग आहे. पण त्याला मोजकेच वनडे सामने खेळण्याची संधी मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच तो श्रीलंका दौऱ्यावर कसोटी मालिकेसाठी मैदानात उतरला होता.
