Ravindra Jadeja Pocket Celebration Viral on Jos Buttler wicket: राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यात विकेट घेतल्यानंतर रवींद्र जडेजाने केलेल्या सेलिब्रेशनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार यशस्वी जैस्वालने नाणेफेक जिंकत गुजरातला फलंदाजीसाठी पाचारण केलं. राजस्थानचा नियमित कर्णधार रियान पराग दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. यादरम्यान गुजरातची फलंदाजीला चांगली सुरूवात झाली. दरम्यान जोस बटलरला बाद केल्यानंतर जडेजाचं सेलिब्रेशन पाहण्यासारखं होतं.
गुजरात टायटन्सचा संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. साई सुदर्शन व शुबमन गिलने संघाला दणक्यात सुरूवात करून दिली. दोघांनीही अर्धशतक झळकावत पहिल्या विकेटसाठी ६५ चेंडूत ११८ धावांची भागीदारी रचली. साई सुदर्शन ३६ चेंडूत ६ चौकार व २ षटकारांसह ५५ धावा करत बाद झाला. तर कर्णधार गिलनेही अर्धशतक झळकावलं. युवा फिरकीपटू यश राजा पुंजाच्या गोलंदाजीवर साई झेलबाद झाला. यानंतर जोस बटलर फलंदाजीला आला.
जोस बटलरसमोर १३वं षटक टाकण्याची जबाबादरी वरिष्ठ फिरकीपटू रवींद्र जडेजाला देण्यात आली. रवींद्र जडेजाच्या जादुई फिरकी चेंडूवर बटलर मोठा फटका खेळायला गेला आणि चेंडू हवेत उंच उडाल्याने झेलबाद झाला. डोनावन फरेराने झेल टिपल्यानंतर रवींद्र जडेजाने भन्नाट सेलिब्रेशन केलं. जडेजाने जोस बटलरकडे दोन्ही हाताने खुणावलं आणि त्यानंतर खिसा उघडून खिशाल टाकल्याची अॅक्शन त्याने केली. खिशावर हात मारत त्याला खिशात ठेवल्याची अॅक्शन केली. जडेजाने या सेलिब्रेशनमध्ये त्याने बटलरकडे बोट दाखवत तुला मी खिशात ठेवतो, असं सांगताना दिसला.
जोस बटलर १० चेंडूत १ चौकार व एका षटकारासह १६ धावा करत बाद झाला. यानंतर आलेल्या वॉशिंग्टन सुंदरने संघाचा डाव सावरला. काही षटकांमध्ये राजस्थानने चांगली गोलंदाजी करत धावांवर नियंत्रण ठेवलं होतं. पण राहुल तेवतिया व वॉशिंग्टनने गुजरात टायटन्सला २२९ धावांपर्यंत नेलं. यासह आता राजस्थानला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना घरच्या मैदानावर हे मोठं लक्ष्य गाठावं लागणार आहे.
राजस्थान आणि गुजरातमधील आजचा सामना जिंकणारा संघ गुणतालिकेत मोठी झेप घेत दुसऱ्या स्थानी जाऊ शकतो. जो संघ सामना जिंकेल त्यांचे १४ गुण होणार असून ते पॉवरप्लेच्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकतील. १६ अंक गाठणारा संघ पॉवरप्लेसाठी पात्र ठरतो. तर १४ गुणांवर राहणाऱ्या संघांमध्ये नेट रन रेटच्या आधारे निर्णय घेतला जातो.
