IND vs NZ 3rd ODI Ravindra Jadeja Catch: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना इंदूरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत न्यूझीलंड संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. या सामन्यात जडेजाने कमालीचा झेल टिपला. ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. जडेजाची मैदानावरील फिल्डिंग व त्याने टिपलेला झेल सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. जडेजाने टिपलेल्या झेलचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

भारताचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि टीम इंडियाने दणक्यात सुरूवात केली. किवी सलामीवीर पहिल्या सात चेंडूत बाद होत माघारी परतले. अर्शदीप सिंगने हेन्नि निकोल्सला क्लीन बोल्ड केलं. तर हर्षित राणाने डेव्हॉन कॉन्वेला झेलबाद करत संघाला दुसऱ्याच षटकात अजून एक विकेट मिळवून दिली. यानंतर विल यंगला झेलबाद करण्यासाठी रवींद्र जडेजाने कमालीचा झेल टिपला.

न्यूझीलंडने सुरुवातीच्या दोन विकेट गमावल्यानंतर, मागील सामन्याप्रमाणेच, विल यंग आणि डॅरिल मिचेल यांनी पुन्हा एकदा डाव सावरला. दोन्ही मधल्या फळीतील फलंदाजांनी स्थिर आणि सावध फलंदाजी केली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचा हिरो असलेला मिचेल मैदानावर स्थिरावला. दुसरीकडे, विल यंग अधिक वेगाने धावा काढण्याचा प्रयत्न करत होता, पण त्यानंतर जे घडलं ते पाहून सगळेच चकित झाले.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा डावातील १३ वे षटक टाकण्यासाठी आला. त्याच्यासमोर विल यंग ४१ चेंडूत ३० धावा करत फलंदाजी करत होता. हर्षितने पहिला एक हार्ड लेन्थ चेंडू टाकला. चेंडू येताच विल यंगने कट मारण्याचा प्रयत्न केला, परंतु रवींद्र जडेजा बॅकवर्ड पॉइंटवर उभा होता. चेंडू त्याच्या उजव्या बाजूने बाहेरच्या दिशेने सरकला आणि त्याने चित्त्यासारखी चपळता दाखवत झेल घेतला आणि यंग झेलबाद झाला.

रवींद्र जडेजाने टिपलेला झेल जरी साधारण वाटत असला तरी त्याने स्वत:ला एडजस्ट करत हा झेल उत्कृष्टपणे टिपला. भारतीय संघाने चांगली सुरूवात केली असली तरी डॅरिल मिचेल व ग्लेन फिलिप्सची जोडी मात्र टीम इंडियाला भारी पडली आहे. ग्लेन फिलिप्स व डॅरिल मिचेल या दोघांनीही शतकं झळकावली असून २०० अधिक धावांची भागीदारी रचली आहे. यासह ४० षटकांपूर्वीच न्यूझीलंडची धावसंख्या २५०च्या पुढे गेली आहे. इंदूरचं स्टेडियम फलंदाजीसाठी चांगलं असल्याने न्यूझीलंडच्या दोन फलंदाजांनी त्याचा चांगलाच फायदा घेतला आहे आणि भारतीय संघ सध्या विकेटच्या प्रतिक्षेत आहे.