वृत्तसंस्था, मेलबर्न

कझाकस्तानच्या पाचव्या मानांकित एलिना रायबाकिना आणि अमेरिकेच्या सहाव्या मानांकित जेसिका पेगुलाने बुधवारी ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. पुरुष एकेरीत इटलीच्या यानिक सिन्नेरने आपली वर्चस्व कायम राखले, तर नोव्हाक जोकोविचला सलग दुसर्‍या लढतीत विजयी घोषित करण्यात आले.

रायबाकिनाने जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेल्या इगा श्वीऑटेकचा ७-५, ६-१ असा धक्कादायक पराभव केला. अमेरिकन खेळाडूंमध्ये झालेल्या दुसर्‍या लढतीत जेसिका पेगुलाने चौथ्या मानांकित ॲमण्डा ॲनिसिमोवाचे आव्हान ६-२, ७-६(७-१) असे संपुष्टात आणले.

उपांत्यपूर्व फेरीतील पराभवाने श्वीऑटेकने कारकीर्दीतील ‘स्लॅम’ पूर्ण करण्याचे स्वप्न अर्धवट राहिले. सुरुवातीला स्व्हिहसमध्ये आलेल्या अडचणींवर मात करून रायबाकिनाने सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन करुन विजय मिळविला. रायबाकिना हिने यापूर्वी २०२३ मध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. तेव्हा अरिना सबालेन्काकडून तिला अंतिम लढतीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर ती उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे जाऊ शकली नव्हती.

पहिल्या सेटमध्ये ‘स्व्हिहस’मधल्या चुकांमुळे सेट टायब्रेकरपर्यंत लांबण्याची शक्यता होती. श्वीऑटेक ५-६ अशा स्थितीत सेटमध्ये टिकून राहण्यासाठी ‘स्व्हिहस’ करत होती. पण, रायबाकिनाच्या ताकदवान फटक्यांमुळे श्वीऑटेक निष्प्रभ ठरली. दुसरा सेट पॉइंट मिळवून रायबाकिनाने सेट जिंकला. दुसर्‍या सेटमध्ये सुरुवातीलाच ब्रेकची संधी साधून रायबाकिनाने आघाडी घेतली. बिनतोड ‘स्व्हिहस’चा धडाका लावून रायबाकिनाने आघाडी ४-१ अशी आघाडी मिळवली. तेव्हा श्वीऑटेकसाठी पुनरागमन करण्याचे मार्ग बंद झाले. रायबाकिनाने तेच वर्चस्व कायम ठेवत सेटसह विजयावर शिक्कमोर्तब केले.

दुसर्‍या लढतीत पेगुलाने कमालीच्या निर्धाराने खेळ करताना ॲनिसिमोवाचे आव्हान संपुष्टात आणले. वयाच्या ३१व्या वर्षी ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याच्या ती अगदी जवळ आली आहे. तिची गाठ एलिना रायबाकिनाशी पडणार आहे. यापूर्वी ग्रँडस्लॅम स्पर्धेत २०२४ मध्ये ती अमेरिकन स्पर्धेत उपविजेती ठरली होती.

आक्रमक खेळ करताना पेगुलाने पहिल्या सेटला ५-२ अशी आघाडी घेतली होती. ॲनिसिमोवाने त्या स्थितीत ‘स्व्हिहस’ राखण्याचा आटोकाट प्रय़त्न केला. मात्र, पुन्हा एकदा तिची ‘स्व्हिहस’ भेदण्यात पेगुलाला यश आले आणि अवघ्या ३० मिनिटांत पेगुलाने पहिला सेट जिंकला. दुसर्‍या सेटला मात्र अखेरपर्यंत दोघींनी आपल्या ‘स्व्हिहस’ राखण्यात यश मिळविले होते. त्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला. या निर्णायक क्षणी ॲनिसिमोवाकडून ‘स्व्हिहस’मध्ये सातत्याने चुका झाल्या आणि पेगुलाने सहजपण टायब्रेक जिंकत विजय नोंदवला.

सिन्नेरचे वर्चस्व

पुरुष एकेरीत गतविजेत्या यानिक सिन्नेरने विजतेपेद राखण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले. सिन्नेरने अमेरिकेच्या बेन शेल्टनचे आव्हान ६-३, ६-४, ६-४ असे सहज संपुष्टात आणले. आतापर्यंतच्या प्रवासात सिन्नेरने केवळ एकदाच सेट गमावला आहे. या लढतीत प्रेक्षकांचा शेल्टनला मोठा पाठिंबा मिळत होता. याचा सिन्नेरच्या खेळावर काही एक परिणाम झाला नाही. बिनतोड ‘स्व्हिहस’ करत सिन्नेरने पहिला सेट ४९ मिनिटांत जिंकला. सिन्नेरच्या खेळात अचूक नियोजन दिसून आले. शेल्टनने आक्रमक खेळ करताना सिन्नेरवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, सिन्नेरने संयमाने त्याला उत्तर दिले. दिशाहीन फटके आणि प्रेक्षकांच्या अतिप्रतिसादाचे दडपण शेल्टन पेलू शकला नाही. नंतरचे दोन्ही सेटही त्याने तितक्याच सहजपणे गमावले.

जोकोविचला पुन्हा पुढे चाल

उपउपांत्यपूर्व फेरीत न खेळताच विजयी झालेला जोकोविच उपांत्यपूर्व फेरीतही नशीबान ठरला. इटलीचा लॉरेन्झो मुसेट्टीने जोकोविचविरुद्ध ६-४, ६-४, १-३ अशी आघाडी घेतली होती. मात्र, उजव्या पायाच्या वरच्या बाजूला होत असलेल्या वेदनांमुळे मुसेट्टीला माघार घ्यावी लागली. यामुळे जोकोविचला विजयी घोषित करण्यात आले. सहाजिकच कारकीर्दीमधील २५व्या ग्रँड स्लॅम विजेतेपदाचे जोकोविचचे स्वप्नही कायम राहिले.