डेव्हिड मिलरने अखेरच्या षटकात दोन दणदणीत षटकार खेचत दिल्ली कॅपिटल्सला ६ विकेट्सने विजय मिळवून दिला. डेव्हिड मिलरला गुजरात टायटन्सविरूद्ध उत्कृष्ट खेळी केल्यानंतर अखेरच्या चेंडूवर दिल्लीला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला होता. पण आता त्या पराभवाचा वचपा मिलरने आरसीबीविरूद्ध काढत दिल्ली कॅपिटल्ससाठी विजयाचा हिरो ठरला. पुन्हा एकदा आरसीबीसाठी हिरवी जर्सी अनलकी ठरली आहे. आरसीबीने हिरवी जर्सी घातल्यानंतर अनेक सामने गमावले आहेत.

अखेरच्या षटकात दिल्लीला विजयासाठी १४ धावांची गरज होती. रोमारियो शेफर्डकडे गोलंदाजीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. रोमारियो पहिले दोन्ही चेंडू कमालीचे टाकत १-१ धावा दिल्या. यानंतर तिसरा चेंडू शेफर्डने फुल टॉस टाकला आणि मिलरने चेंडू षटकारासाठी पाठवला. यानंतर चौथ्या चेंडूवरही मिलरने षटकार खेचला. यासह विजयासाठी अखेरच्या दोन चेंडूत एका धावेची गरज होती आणि मिलरने अखेरच्या चेंडूवर चौकार खेचला आणि दिल्लीने ६ विकेट्सने विजय मिळवला.

आरसीबीने दिलेल्या १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात खूपच खराब झाली. भुवनेश्वर कुमारने पहिल्या २ षटकांत ३ विकेट्स घेतल्या. केएल राहुलने वाढदिवसादिवशी अर्धशतकी खेळी केली. राहुलने ३४ चेंडूत ६ चौकार व २ षटकारासह ५७ धावांची खेळी केली. तर ट्रिस्टन स्टब्स अर्धशतक करत मैदानावर कायम होता. अक्षर पटेल २६ धावा करत रिटायर्ड हर्ट झाला. तर अक्षर रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर फलंदाजीला आला. डेव्हिड मिलर अखेरीस संघाला रोमहर्षक विजय मिळवून देत माघारी परतला. मिलरने १० चेंडूत २ षटकार आणि एका चौकारासह २२ धावांची खेळी केली. तर ट्रिस्टन स्टब्स नाबाद परतला. स्टब्सने संघाचा डाव सावरत ४७ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह ६० धावा केल्या.

दिल्लीने नाणेफेक जिंकत आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. आरसीबीने सावध सुरूवात केली, पण दिल्लीने ठराविक अंतराने फलंदाजांना बाद करत धावांवर अंकुश ठेवला. विराट कोहली अवघ्या १९ धावा करत बाद झाला. तर फिल सॉल्टने ३८ चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांसह ६३ धावांची खेळी केली. तर देवदत्त पडिक्कलने १८ धावांचं योगदान दिलं. तर टीम डेव्हिडने २६ आणि जितेश शर्माने १४ धावांचं योगदान दिलं. कृणाल पंड्याने १२ धावांचं योगदान दिलं. यासह २० षटकांत आरसीबीने ८ बाद १७५ धावा केल्या आहेत. तर दिल्लीकडून अक्षर पटेल, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर मुकेश कुमारने १ विकेट घेतली.

मात्र, हिरव्या जर्सीत खेळताना आरसीबीची कामगिरी चांगली राहिलेली नाही. २०११ पासून, आरसीबीने हिरव्या जर्सीत एकूण १५ सामने खेळले असून, त्यापैकी केवळ पाच सामने जिंकले आहेत. त्यांना नऊ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला असून, एक सामना अनिर्णित राहिला आहे. गेल्या हंगामात, आरसीबीने हिरव्या जर्सीत राजस्थान रॉयल्सला नऊ गडी राखून पराभूत केलं होतं.