DC vs RCB Match Highlights IPL 2026: आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियममध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने आपला दबदबा राखला आणि ८१ चेंडूत राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत दिल्लीला अवघ्या ७६ धावांवर सर्वबाद केलं. गेल्या सामन्यात २६४ धावा आणि या सामन्यात दिल्लीचा संघ फक्त ७५ धावा करू शकला. यामागचं कारण म्हणजे जोश हेझलवूड आणि भुवनेश्वर कुमारची भेदक गोलंदाजी.

दिल्लीने दिलेल्या ७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने अवघ्या ६.३ षटकांत सामना जिंकला. जेकब बेथल व विराट कोहलीच्या जोडीने डावाला सुरूवात केली. जेकब बेथलने या सामन्यात २ गगनचुंबी षटकार लगावत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. बेथल २० धावा करत काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. नटराजनने उत्कृष्ट झेल टिपत त्याला बाद केलं. यानंतर विराट कोहली व देवदत्त पडिक्कल यांनी संघाला विजय मिळवून दिला. आपल्या वादळी फॉर्मात असलेल्या पडिक्कलने अवघ्या १३ चेंडूत ३ चौकार व ३ षटकारांसह ३४ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने १५ चेंडूत १ चौकार व २ षटकारांसह २३ धावांची खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा विजय सोपा केला.

विराट कोहलीने या सामन्यात ११ धावा करताच मोठा टप्पा गाठला. विराटने आयपीएलमध्ये ९ हजार धावांचा पल्ला पार केला. विराट हा आयपीएलमध्ये ९ हजार धावा करणारा पहिला खेळाडू आहे.

हेही वाचा

आरसीबीने नाणेफेक जिंकत दिल्लीला गोलंदाजीसाठी पाचारण केलं. दिल्लीची सर्वात खराब सुरूवात झाल्याने संघ अवघ्या १०० धावाही करू शकला नाही. दिल्लीने ४ षटकांत ६ विकेट्स गमावल्या. भुवनेश्वर कुमारने पहिल्या षटकात साहिल पारखला क्लीन बोल्ड केलं. त्यानंतर जोश हेझलवूडने दुसऱ्या षटकात केएल राहुल व समीर रिझवी यांनी बाद करत माघारी धाडलं. यानंतर ट्रिस्टन स्टब्स व अक्षर पटेलला भुवनेश्वर कुमारने झेलबाद केलं. हेझलवुड व भुवनेश्वर कुमारने कसोटी क्रिकेटमधील लाईन लेंग्थसह दिल्लीची अवस्था बिकट केली. यासह पॉवरप्लेमध्ये दिल्लीची स्थिती ६ बाद १३ अशी होती.

डेव्हिड मिलर व अभिषेक पोरेल यांनी ३५ धावांची भागीदारी रचली होती. पण रसिख दर सलामने मिलरला झेलबाद करत संघाला मोठी विकेट मिळवून दिली. मिलर १९ धावा करत बाद झाला, यानंतर काईल जेमिसनने १२ धावांची खेळी केली. जेमिसनला कृणाल पंड्याने पायचीत केलं. यानंतर कुलदीप यादवला सुयश शर्माने क्लीन बोल्ड केलं. तर अभिषेक पोरेल ३३ चेंडूत ३ चौकारांसह ३० धावा केल्या. अभिषेक पोरेलला जोश हेझलवूडने १७व्या षटकात क्लीन बोल्ड केलं. यासह दिल्लीचा संघ फक्त ७५ धावांवर सर्वबाद झाला.

आरसीबीकडून या सामन्यात जोश हेझलवूडने ३.३ षटकांमध्ये १२ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारने ३ षटकांत फक्त ५ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. यादरम्यान भुवनेश्वरची इकॉनॉमी १.७० होती. याशिवाय सुयश शर्मा, कृणाल पंड्या, रसिख सलाम दर यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.