RCB vs GT IPL 2026 Match Highlights in Marathi: आरसीबीने १९व्या षटकात गुजरातवर ५ विकेट्सने विजय मिळवत गुणतालिकेत दुसरं स्थान गाठलं. चेस मास्टर विराट कोहलीने देवदत्त पडिक्कलने शतकी भागीदारी रचत संघाच्या विजयाचा पाया रचला. विराटचं शतक हुकलं असलं तरी या सामन्यात ८१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. गुजरातने साई सुदर्शनच्या शतकी खेळीच्या बळावर प्रथम फलंदाजी करताना २०५ धावांची खेळी केली. तर प्रत्युत्तरात विराट व पडिक्कलनंतर अखेरच्या षटकांमध्ये २३ धावांची खेळी करत कृणाल पंड्याने संघाला ७ विकेट्स राखून शानदार विजय मिळवून दिला.

साई सुदर्शन-शुबमन गिलची भागीदारी

साई सुदर्शन व शुबमन गिल यांनी संघाला दणक्यात सुरूवात करून दिली. साई व गिलने पहिल्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी रचली. १३व्या षटकात शुबमन गिलच्या रूपात संघाने पहिली विकेट गमावली. सुयश शर्माच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. गिलने २४ चेंडूत २ चौकार व एका षटकारासह ३२ धावा केल्या. साई सुदर्शनने या सामन्याक ५८ चेंडूत ११ चौकार व ५ षटकारांसह १०० धावा केल्या.

साई सुदर्शनचं शतक

साई सुदर्शनने आरसीबीविरूद्ध सामन्यात यंदाच्या आयपीएलमधील पहिलं शतक झळकावलं. साईने ५५ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. साईने शतक पूर्ण केल्यानंतर डगआऊटकडे बघून सेलिब्रेशन केलं, पण त्याने हेल्मेटदेखील काढलं नाही. साई सुदर्शन या खेळीदरम्यान सर्वात कमी डावांमध्ये जलद २ हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला. तर सलग तीन हंगामात शतकी खेळी करणारा साई सुदर्शन हा एकमेव फलंदाज आहे.

विराट कोहली-देवदत्त पडिक्कलची वादळी फलंदाजी

गुजरातने दिलेल्या २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जेबक बेथल लवकर बाद झाल्यानंतर विराट कोहली व देवदत्त पडिक्कल यांनी वादळी फटकेबाजी करत संघाच्या विजयाचा पाया रचला. विराट व पडिक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५९ चेंडूत ११५ धावांची उत्कृष्ट भागीदारी रचली. देवदत्त पडिक्कल २७ चेंडूत २ चौकार व ६ षटकारांसह २०३ च्या स्ट्राईक रेटने ५५ धावांची शानदार खेळी केली.

विराट कोहलीची ८१ धावांची खेळी

चेस मास्टर विराट कोहलीने गुजरात टायटन्सविरूद्ध सामन्यात कमालीच्या फॉर्मात होता. मोहम्मद सिराजच्या पहिल्या षटकात विराट गोल्डन डकवर बाद होणार होता, पण वॉशिंग्टन सुंदरकडून त्याचा कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर कोहलीने आपला विराट अंदाज दाखवला. विराटने ४४ चेंडूत८ चौकार व ४ षटकारांसह ८१ धावांची खेळी केली.

कृणाल पंड्याच्या २२ धावा

कृणाल पंड्या आज गोलंदाजीत फारशी प्रभावी कामगिरी करू शकला नाही. पण अखेरच्या षटकांमध्ये मात्र त्याने संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. विराट कोहली १४व्या षटकात होल्डरच्या गोलंदाजीवर बाद झाला. यासह सलग दोन षटकांत जितेश शर्मा व रजत पाटीदार बाद झाले. यामुळे आरसीबी संघावरचा दबाव वाढला. यानंतर कृणाल पंड्याने मानव सुतारच्या १७व्या षटकात उत्कृष्ट फटकेबाजी केली. या षटकात त्याने २ चौकार व १ षटकार लगावला आणि १९व्या षटकात चौकार लगावत त्याने संघाला विजय मिळवून दिला. कृणालने या सामन्यात १२ चेंडूत ३ चौकार व एका षटकारासह २३ धावा केल्या.