RCB vs GT Qualifier-1 Match Highlights: आयपीएल २०२६च्या अंतिम सामन्याचा पहिला संघ ठरला. पहिल्या क्वालिफायर सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सवर दणदणीत विजय मिळवत अंतिम सामन्यात धडक मारली. आरसीबीने गुजरातचा ९२ धावांनी पराभव केला. आरसीबीने सांघिक कामगिरीच्या बळावर हा शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २५४ धावांचा डोंगर उभारला. ही धावसंख्या आयपीएल प्लेऑफ इतिहासातील आजवरची सर्वात मोठी धावसंख्या होती. तर पराभूत झालेला संघ गुजरात टायटन्स २९ मे रोजी दुसरा क्वालिफायर सामना खेळणार आहे.

आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केल्यानंतर गुजरातचे गोलंदाज व फिल्डिंगमधील काही चुकांमुळे गुजरातचा संघ मागे पडला. रजत पाटीदार दोन वेळा जीवदान मिळाल्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही आणि नाबाद ९३ धावांची वादळी खेळी साकारली. यासह आरसीबीने प्रथम फलंदाजी २५४ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात चांगली सुरूवात केल्यानंतर गुजरातचा डाव मात्र पत्त्यांसारखा कोसळला. गुजरातने पॉवरप्लेमध्येच ५ विकेट्स गमावल्या आणि इथेच सामना आरसीबीने आपल्या बाजूने फिरवला.

आरसीबीने दिलेल्या २५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने पहिल्या षटकात चौकारांच्या फटकेबाजीसह सुरूवात केली. पण यानंतर मात्र संघाचा डाव पत्त्यांसारखा कोसळला. गुजरातने पॉवरप्लेमध्ये ५ विकेट्स गमावल्या आणि आरसीबीने इथेच सामना आपल्या बाजूने वळवला होता. साई सुदर्शन १४ धावांवर हिट विकेटमुळे बाद झाला. तर भुवनेश्वर कुमारने २ धावांवर शुबमन गिलला तर जोश हेझलवूडने बटलरला २९ धावांवर क्लीन बोल्ड केलं. तर रसिख सलामने सहावं षटक डबल विकेट्स मेडन टाकत गुजरातला मोठे धक्के दिले. रसिखने या षटकात निशांत सिंधु व जेसन होल्डरला बाद केलं.

यानंतर वॉशिंग्टन सुंदर ८ धावा, रशीद खान ८ धावा तर कगिसो रबाडा ९ धावांवर बाद झाले. तर गुजरातकडून राहुल तेवतियाने एकट्याने कडवी झुंज दिली. राहुल तेवतिया ४३ चेंडूत ८ चौकार व ४ षटकारांसह ६८ धावा करत बाद झाला. आरसीबीकडून जेबक डफीने ३ विकेट्स, तर रसिख सलामने व भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी २ विकेट्स हेझलवूड, कृणाल पंड्या यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी गुजरातने नाणेफेक जिंकत आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. वेंकटेश अय्यर व विराट कोहलीची जोडी फलंदाजीसाठी उतरली. वेंकटेश १९ धावा करत झेलबाद झाला. त्यानंतर विराट कोहली व देवदत्त पडिक्कल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३८ चेंडूत ७२ धावांची खेळी केली. विराट २५ चेंडूत ४३ धावा तर देवदत्त पडिक्कल ३० धावा करत बाद झाले. यानंतर रजत पाटीदार व कृणाल पंड्या यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी ४५ चेंडूत ९५ धावांची खेळी केली.

कर्णधार रजत पाटीदारने ३३ चेंडूत ५ चौकार व ९ षटकारांसह ९३ धावांची खेळी केली. तर कृणाल पंड्याने २८ चेंडूत ४३ धावांचं योगदान दिलं. तर जितेश शर्माला अखेरीस सूर गवसला आणि त्याने ५ चेंडूत एक चौकार एक षटकारासह १५ धावांची खेळी केली आणि संघाला २५४ धावांपर्यंत नेण्यात पाटीदारची चांगली साथ दिली. गुजरातकडून कगिसो रबाडा व जेसन होल्डर यांनी प्रत्येकी २ विकेट्स तर प्रसिधने १ विकेट घेतली.