आरसीबी संघाने सलग दुसऱ्यांदा मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानावर पराभव केला आहे. आरसीबीने मुंबईचा १८ धावांनी पराभव केल्याने हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखालील या संघाने पराभवाची हॅटट्रिक लगावली आहे. आरसीबीने सांघिक कामगिरीच्या बळावर हा शानदार विजय नोंदवला आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाजीत मुंबईचा संघ कमी पडला.

आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना टॉप-५ फलंदाजांच्या बळावर २० षटकांत ४ बाद २४० धावा केल्या. तर प्रत्युत्तरात मुंबईचा संघ २० षटकांत ५ बाद २ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर गेल्याचा फटका मुंबई इंडियन्सला चांगलाच धक्का बसला आहे.

आरसीबीने दिलेल्या २४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व रायन रिकल्टन यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे. रिकल्टन-रोहितने मुंबईला पॉवरप्लेमद्ये ६० धावांच्या जवळ नेलं. पण रोहित शर्मा सहाव्या षटकात हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर परतला. याचा मुंबईला चांगलाच फटका बसला. यानंतर रिकल्टन व तिलक वर्मा एकाच षटकात बाद झाल्याने मुंबईच्या धावांना ब्रेक लागला. रिकल्टन ३७ धावा तर तिलक १ धाव करत बाद झाला.

त्यानंतर सूर्यकुमार यादव व हार्दिक पंड्या यांनी संघाचा डाव सावरला. पण दोघेही ठराविक अंतराने विकेट्स गमावत बाद झाले. सूर्या ३३ धावा करत तर हार्दिक ४० धावा करत बाद झाले. पण शेरफन रूदरफोर्डने अखेरच्या षटकात कमालीची खेळी केली. रूदरफोर्डने ३१ चेंडूत ९ षटकार व एका चौकाराच्या मदतीने ७१ धावांची उत्कृष्ट खेळी केली. त्याच्या या वादळी खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने फक्त १८ धावांच्या फरकाने सामना गमावला.

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आणि आरसीबीच्या सलामी जोडीने वादळी खेळी केल्या. फिल सॉल्ट व विराट कोहलीच्या जोडीने ६५ चेंडूत १२० धावांची भागीदारी रचली. फिल सॉल्ट ३६ चेंडूत ६ चौकार व ६ षटकारांसह ७८ धावा करत बाद झाला. त्यानंतर विराट कोहली ३८ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह ५० धावा करत माघारी परतला. तर रजत पाटीदारचं वानखेडेच्या मैदानावर जणू वादळ आलं होतं. पाटीदारने २० चेंडूत ४ चौकार व ५ षटकारांसह ५३ धावांची वादळी खेळी केली. तर टीम डेव्हिडने १६ चेंडूत २ चौकार व ३ षटकारांसह ३४ धावांची झटपट खेळी केली.