Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru: पंजाब किंग्सने आयपीएल २०२६ स्पर्धेत अशी सुरुवात केली होती, जी आजवर कुठल्याही संघाला करता आली नव्हती. पण शेवटही असा केला आहे, जो कुठल्याही संघाने आजवर केलेला नाही. पंजाबने या स्पर्धेतील सुरुवातीच्या ६ पैकी ६ सामन्यांमध्ये विजय मिळवला होता. आता सलग ६ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. स्पर्धेतील ६१ वा सामना पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २० षटकांअखेर २२२ धावा केल्या होत्या. २२३ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबल १९९ धावांपर्यंत मजल मारता आली. पंजाबला हा सामना २३ धावांनी गमवावा लागला आहे. यासह पंजाबचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतन बाहेर पडला आहे.

या सामन्यात पंजाब किंग्स संघाला विजयासाठी २२३ धावा करायच्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला चांगल्या सुरुवातीची गरज होती. पण भुवनेश्वर कुमारने पंजाबला लागोपाठ धक्के दिले. प्रियांश आर्य शून्यावर माघारी परतला. तर प्रभसिमरन सिंग अवघ्या २ धावांवर माघारी परतला. त्यानंतर कुपर कॉनोलीने ३७ धावांचे योगदान दिले. कर्णधार श्रेयस अय्यरकडून या डावात मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तो १ धाव करुन माघारी परतला. शेवटी सूर्यांश शेडगेने ३५ धावांची तुफानी खेळी केली. तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आलेल्या मार्कस स्टोइनिसने ३७ धावा केल्या. शेवटी शशांक सिंगने अर्धशतक झळकावून पंजाबला विजय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण पंजाबचा संघ विजयापासून २३ धावा दूर राहिला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने केल्या २२२ धावा

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना जेकब बेथेल अवघ्या ११ धावांवर माघारी परतला. त्यानंतर विराट कोहलीने ५८ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर देवदत्त पडिक्कलने ४५ धावा केल्या. टिम डेव्हिडने २८ धावांचे योगदान दिले. तर शेवटी वेंकटेश अय्यरने नाबाद ७३ धावांची खेळी करुन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला २२२ धावांपर्यंत पोहोचवलं.

पंजाब किंग्स संघाला या स्पर्धेतील जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. गेल्या हंगामात पंजाबचा विजय थोडक्यात हुकला होता. यावेळी सलग ६ सामने जिंकून पंजाबने प्लेऑफमध्ये सर्वात आधी प्रवेश करण्यासाठी दावा केला होता. पण सुरुवातीचे ६ सामने जिंकल्यानंतर पंजाबला पुढील लागोपाठ ६ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.