IPL 2026 RCB Creates History: आयपीएल २०२६ मधील आजचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जात आहे. दिल्ली संघाने या सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, तर आरसीबीचा संघ फलंदाजीने या ऐतिहासिक सामन्याला सुरूवात करत आहे. आरसीबीचा संघ एम चिन्नास्वामी मैदानावर खेळण्यासाठी उतरताच मोठा विक्रम केला आहे. आयपीएल इतिहासात हा मोठा पराक्रम करणारा आरसीबी पहिला संघ ठरला आहे.

एम. चिन्नास्वामी स्टेडियम हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं घरचं मैदान आहे. आरसीबी दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध आज चिन्नास्वामी स्टेडियममध्ये १०० वा सामना खेळण्यासाठी उतरली आहे. यामुळे आरसीबी एकाच मैदानावर १०० आयपीएल सामने खेळणारा पहिला संघ ठरला आहे. या मैदानावर आरसीबीची कामगिरी चांगली राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या या ऐतिहासिक सामन्यात संघाच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे.

चिन्नास्वामी स्टेडियमवरील आरसीबीच्या कामगिरीची आकडेवारी कशी आहे पाहूया. आरसीबी संघाने या मैदानावर ९९ सामने खेळले असून, त्यापैकी ४८ सामने जिंकले आहेत आणि ४६ सामने गमावले आहेत. या मैदानावर एक सामना बरोबरीत सुटला आहे, तर चार सामन्यांचा निकाल लागलेला नाही. या आयपीएल हंगामात, आरसीबीने आपल्या घरच्या मैदानावर तीन सामने खेळले असून, तिन्हीही जिंकले आहेत. परिणामी, दिल्लीविरुद्धच्या या सामन्यात आरसीबीचं पारडं जड दिसत आहे.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात आरसीबीचे खेळाडू हिरव्या रंगाची जर्सी घालून उतरले आहेत. हिरवी जर्सी हा आरसीबीच्या ‘ग्रीन इनिशिएटिव्ह’चा एक महत्त्वाचा भाग आहे. या जर्सी पुनर्वापर केलेल्या टाकाऊ वस्तूंपासून बनवल्या जातात. २०११ पासून, आरसीबी प्रत्येक हंगामातील एका सामन्यात हिरव्या रंगाची जर्सी परिधान करत आली आहे.

मात्र, हिरव्या जर्सीत खेळताना आरसीबीची कामगिरी चांगली राहिलेली नाही. २०११ पासून, आरसीबीने हिरव्या जर्सीत एकूण १५ सामने खेळले असून, त्यापैकी केवळ पाच सामने जिंकले आहेत. त्यांना नऊ सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला असून, एक सामना अनिर्णित राहिला आहे. गेल्या हंगामात, आरसीबीने हिरव्या जर्सीत राजस्थान रॉयल्सला नऊ गडी राखून पराभूत केलं होतं. यंदाच्या हंगामात आतापर्यंत आरसीबीचा फॉर्म उत्कृष्ट राहिला आहे. संघाने आतापर्यंत पाच सामने खेळले असून, त्यापैकी चार सामने जिंकले आहेत. आरसीबी आठ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.