IPL 2026 Opening Match: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धा समाप्त झाली असून आता क्रिकेट चाहते आयपीएल २०२६ स्पर्धेची आतूनरतेने वाट पाहत आहेत. बीसीसीआयकडून अजूनपर्यंत या स्पर्धेच्या अधिकृत वेळापत्रकाची घोषणा करण्यात आलेली नाही. तरीदेखील या स्पर्धेची जोरदार चर्चा रंगली आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेत झालेल्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात पंजाब किंग्ज विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाबला पराभूत करून १७ वर्षांत पहिल्यांदाच जेतेपदाचा मान पटकावला होता. दरम्यान आगामी हंगामातील पहिल्या सामन्यातही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सामना पाहायला मिळू शकतो.
आयपीएल स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं नसलं तरीदेखील ही स्पर्धा केव्हा सुरू होणार, ही तारीख समोर आली आहे. या स्पर्धेची सुरूवात २८ मार्चपासून होणार आहे. १२ मार्चला या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. माध्यमातील वृत्तानुसार, स्पर्धेतील पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर केलं जणार आहे. दरम्यान पहिल्या सामना कोणत्या २ संघांमध्ये होणार, याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
या २ संघांमध्ये होणार पहिला सामना
आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं, तर गेल्या हंगामात जो संघ जेतेपदाचा मानकरी ठरलेला असतो, त्या संघाला पहिला सामना खेळण्याचा मान मिळतो. पण कधीकधी इतर संघांनाही मान दिला गेला आहे. पण यावेळी गतविजेत्या संघाला पहिला सामना खेळण्याचा मान दिला जाऊ शकतो. क्रिकबझच्या वृत्तानुसार, स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाऊ शकतो. रॉयल चॅलेंजर्सचा संघ पहिला सामना खेळणार हे तर निश्चित आहे. पण समोर पंजाबऐवजी चेन्नईचा संघ असू शकतो.
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांच्या चाहत्यांची संख्या सर्वात जास्त आहे. बीसीसीआयचा नेहमी असा प्रयत्न असतो की, पहिला सामना हा रोमांचक व्हायला हवा. त्यामुळे पहिल्या सामन्यात नेहमी बलाढ्य संघांचा सामना पाहायला मिळत असतो. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ पहिल्याच सामन्यात आमनेासामने येऊ शकतात. तर पंजाब किंग्जचा संघ मुल्लानपूरमध्ये आपला पहिला सामना गुजरात टायटन्स संघाविरूद्ध खेळताना दिसून येऊ शकतो.
