Parthiv Patel On Virat Kohli Captaincy: विराट कोहली आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग आहे. यादरम्यान त्याने संघाचं नेतृत्वही केलं, पण त्याच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला आयपीएलची एकही ट्रॉफी जिंकता आली नव्हती. यादरम्यान विराट कोहलीला कर्णधारपदावरून काढलं जाणार होतं आणि पार्थिव पटेलकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाणार होती, असं वक्तव्य स्वतः पार्थिव पटेलने केलं आहे. काय म्हणाला? जाणून घ्या.
पार्थिव पटेलने माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राच्या पॉडकास्टमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाबाबत मोठा खुलासा केला आहे. गॅरी कर्स्टन आणि आशीष नेहराने पार्थिवला आधीच सांगितलं होतं की, तू या संघाचा कर्णधार होणार आहे. आयपीएलच्या २०१८-१९ हंगामादरम्यान आशीष नेहरा संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. तर गॅरी कर्स्टन मुख्य प्रशिक्षक होते. २०१९ मध्ये झालेल्या स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा फ्लॉप शो पाहायला मिळाला होता. संघ गुणतालिकेत सर्वात खालच्या स्थानी होता. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल केला आणि दोघांना काढून टाकलं.
पार्थिव पटेल काय म्हणाला?
विराट कोहलीनंतर पार्थिव पटेल आणि मोईन अली देखील कर्णधारपदाच्या शर्यतीत होता. या पॉडकास्टमध्ये बोलताना पार्थिव पटेल म्हणाला, “मी याबाबत कधीच बोललो नाही, पण मोईन अलीने देखील एका मुलाखतीत या गोष्टीचा उल्लेख केला होता. मला सांगण्यात आलं होतं की, तयार राहा.. आम्ही आगामी हंगामासाठी तुला कर्णधार बनवण्याचा विचार करतोय. पण पुढच्या हंगामात ज्यांनी मला कर्णधारपदाची ऑफर दिली होती, त्यांना काढून टाकलं. नवे प्रशिक्षक आले आणि मला त्या हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
कर्णधारपद सोडा, पार्थिव पटेलला २०२० च्या आयपीएल हंगामात एकही सामना खेळायची संधी मिळाली नव्हती. या संपूर्ण हंगामात एबी डिव्हिलियर्सने यष्टिरक्षकाची जबाबदारी पार पाडली. २०२० मध्ये झालेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला होता. २०२० मध्येच पार्थिव पटेलने आयपीएल स्पर्धेतून निवृत्तीची घोषणा केली. २०२० आणि २०२१ मध्ये झालेल्या हंगामात विराट कोहली संघाचा कर्णधार होता. या हंगामात त्याने संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता.
