आपल्या देशामध्ये क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही तर एक ‘इमोशन’ आहे. क्रिकेटला राष्ट्रीय स्तरावर महत्त्व तर आहेच शिवाय त्याला चाहत्यांच्या भावनांचीही एक किनार आहे. त्यामुळेच इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धांचा भारतात अक्षरश: सण-समारंभांप्रमाणे आनंद घेतला जातो. काही चाहते तर क्रिकेट, खेळाडू आणि त्यांच्याशी संबंधित गोष्टींसाठी इतके वेडे आहेत की त्यासाठी ते काहीही करण्यास तयार आहेत. शुक्रवारी (२७ मे) अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या क्वॉलिफायर २ या सामन्यात याची सर्वांना पुन्हा एकदा प्रचिती आली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्सच्या सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका तरुणीने कॅमेरामनचे लक्ष वेधून घेतले.

आयपीएल स्पर्धेला सुरुवात होऊन १५ वर्षे झाली आहेत. मात्र, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाला आतापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. बंगळुरूचे चाहते विजेतेपदाची अगदी चातकासारखी वाट बघत आहेत. एका तरुणीने तर, ‘जोपर्यंत आरसीबी आयपीएलचे विजेतेपद जिंकत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही’, अशी प्रतिज्ञाच घेतली आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या क्वॉलिफायर सामन्या दरम्यान प्रेक्षकांमध्ये ही तरुणी हातामध्ये आपल्या निश्चयाचा फलक हातात घेऊन उभी होती.

पुण्यातील डीवाय पाटील स्पोर्ट अॅकॅडमी स्टेडियमवर झालेल्या सामन्यादरम्यानही ही तरुणी उपस्थित होती. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यादरम्यान ही तरुणी असाच फलक घेऊन उभी होती. तेव्हापासून या पोस्टर गर्लचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दुर्दैवाने, काल झालेल्या क्वॉलिफायर २ सामन्यात आरसीबीला राजस्थान रॉयल्सकडून परावभ स्वीकारावा लागला. राजस्थानने सात गडी राखून हा सामना जिंकल आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला. काल झालेल्या पराभवामुळे आरसीबीचा संघ आणि चाहते दोघांचंही विजेतपद जिंकण्याचं स्वप्न भंग झाले आहे.