आयपीएल २०२१ स्पर्धेच्या चषकासाठी आता चार संघात लढत आहे. दिल्ली, चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता या संघात प्लेऑफची लढत आहे. प्लेऑफपूर्वीच्या साखळी सामन्यात बंगळुरु विरुद्ध दिल्ली सामन्यात केएस भरतची बॅट चांगलीच तळपली. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात बंगळुरूने विजय मिळवला. एका चेंडूत ५ धावांची आवश्यकता असताना केएस भरतनं षटकार ठोकला आणि विजय मिळवून दिला.

बंगळुरूला शेवटच्या षटकात ६ चेंडूत १५ धावांची आवश्यकता होती. आवेश खानने टाकलेल्या षटकातील पहिल्या पाच चेंडूत बंगळुरूने १० धावा केल्या. मात्र विजयासाठी शेवटच्या चेंडूवर ५ धावांची आवश्यकता होती. बंगळुरूची धाकधूक वाढली असताना शेवटच्या चेंडूवर भरतने षटकार ठोकला आणि विजय मिळवून दिला. या सामन्यात भरतने नाबाद ७८ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. सामना संपल्यानंतर भरतने शेवटच्या चेंडूवर मनात काय काहूर माजला होतं?, याचं उत्तर दिलं.

“शेवटचा चेंडूवर विजय मिळवणं खरंच खास आहे. मी शब्दात सांगू शकत नाही. शेवटच्या षटकात माझी मॅक्सवेलसोबत संवाद होत होता. तो माझं मनोबल वाढवत होता. शेवटच्या तीन चेंडूवर मी मॅक्सवेलला सिंगलबद्दल विचारलं तेव्हा त्याने सांगितलं तू खेळ, तू सामना जिंकवू शकतो. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर मी चेंडूवर फोकस करत होतो. वाइड चेंडूनंतर मी एका संधीच्या शोधात होतो आणि ती संधी मला मिळाली”, असं केएस भरत याने सांगितलं.

दिल्लीने दिलेल्या १६५ धावांचा पाठलाग करताना बंगळुरूची अडखळत सुरुवात झाली. पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर देवदत्त पडिक्कल बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीही मैदानात तग धरू शकला नाही. अवघ्या ४ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर एबी डिव्हिलियर्स बाद झाला. त्यानंतर श्रीकर भारत आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी सावरला. चौथ्या गड्यासाठी दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. श्रीकर भारतने अर्धशतक केलं. तर त्याला ग्लेन मॅक्सवेलची मोलाची साथ लाभली.केएस भरतने ५२ चेंडूत ७८ धावांची नाबाद खेळी केली. तर ग्लेन मॅक्सवेलने ३३ चेंडूत नाबाद ५१ धावा केल्या.