RCB Sold to Aryaman Birla Led Group for 1.78 billion: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेरीस २०२५ च्या हंगामात आयपीएलचं जेतेपद पटकावलं. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विकत घेण्यासाठी ऐतिहासिक डील झाली. आदित्या बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील समुहाने जवळपास १.७८ बिलियन म्हणजेच १६ हजार ६०० कोटी खर्चून आरसीबी संघ खरेदी केला आहे.

आयपीएल २०२६ पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाला आदित्य बिर्ला समूह, द टाइम्स ऑफ इंडिया समूह, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोनच्या पर्पेच्युअल प्रायव्हेट इक्विटी स्ट्रॅटेजी (बीएक्सपीई) या सर्व समुहांनी मिळून एकत्रितपणे १.७८ अब्ज डॉलर्स देऊन विकत घेतलं आहे. या व्यवहारानंतर आरसीबीच्या अध्यक्षपदी आदित्य बिर्ला समूहाचे संचालक आर्यमन विक्रम बिर्ला असणार आहेत.

आर्यमन बिर्ला हे स्वतः व्यावसायिक क्रिकेटपटू असून जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये त्यांची गणना केली जाते. द टाइम्स ऑफ इंडिया समूहाचे सत्यन गजवानी हे फ्रँचायझीचे उपाध्यक्ष असतील. या कन्सोर्टियममध्ये बोल्ट व्हेंचर्सचे संस्थापक डेव्हिड ब्लिट्झर आणि बीएक्सपीईचे मुख्य कार्यकारी अधिकारी विरल पटेल यांचाही समावेश आहे.

क्रिकबजच्या वृत्तानुसार, या चार समूहांच्या कन्सोर्टियमने आरसीबीमधील १०० टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी डियाजिओची उपकंपनी युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडसोबत करार केला आहे. या करारात आरसीबीच्या आयपीएल आणि महिला प्रीमियर लीग (WPL) या दोन्ही संघांचा समावेश आहे. आरसीबीच्या विक्रीला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तसेच भारतीय स्पर्धा आयोग आणि इतर नियामक संस्थांची मंजुरी आवश्यक आहे. त्यामुळे आयपीएल २०२६ हंगामात आरसीबीचे संचालन डियाजिओकडूनच केले जाणार आहे.

आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी निवेदनात म्हटलं की, “गेल्या दोन दशकांत आयपीएलने जागतिक स्तरावर क्रीडा क्षेत्रात मोठी ताकद निर्माण केली आहे. भारतीय क्रिकेटचे चित्र बदलत भारताची प्रतिष्ठा वाढवण्यात आयपीएलचा मोठा वाटा आहे. आधुनिक काळात आरसीबी ही सर्वात प्रभावी फ्रँचायझींपैकी एक असून, आदित्य बिर्ला समूहाला जागतिक क्रीडा क्षेत्रात आपली परंपरा पुढे नेण्यासाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ मिळत आहे. या संघाचे संरक्षक बनताना आम्हाला आनंद होत आहे आणि या समृद्ध वारशाला पुढे नेण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”

आर्यमन बिर्ला काय म्हणाले?

नवीन अध्यक्ष आर्यमन बिर्ला यांनी ही जबाबदारी मिळणं आपल्या दृष्टीने सन्मानाची बाब असल्याचे सांगितलं. ते म्हणाले, “आरसीबीच्या पुढील टप्प्यातील विकासाला दिशा देण्यासाठी या भागीदारीत सहभागी होणं आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.”