रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २०२६ इंडियन प्रीमियर लीगचं विजेतेपद जिंकून संघातील दोन महत्त्वाच्या व्यक्तींना वाढदिवसाचं खास गिफ्ट दिलं आहे. संघाचा कर्णधार रजत पाटीदार व दिनेश कार्तिक यांचा आज १ जून रोजी वाढदिवस आहे. ३१ मे रोजी, आरसीबीने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला ५ गडी राखून पराभूत करून आपली सलग दुसरी ट्रॉफी जिंकली. कर्णधार रजत पाटीदारसह मार्गदर्शक आणि फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्तिकने संघाच्या या सलग दुसऱ्या विजेतेपदामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
दिनेश कार्तिक त्याचा ४१ व्या वाढदिवस तर रजत पाटीदार त्याचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. आरसीबीने जेतेपद जिंकत या दोघांना वाढदिवसाचं खास गिफ्ट दिलं आहे. गुजरातला नमवत पटकावलेलं जेतेपद रजत पाटीदारसाठी अधिक खास होतं, कारण रजत पाटीदार हा या विजयासह सलग दोन आयपीएल हंगाम जिंकणारा केवळ तिसरा कर्णधार ठरला. रोहित शर्मा व एम एस धोनी या दिग्गज कर्णधारांच्या यादीत त्याने स्थान मिळवलं.
दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी संघात आलेल्या पाटीदारने अवघ्या चार वर्षांत आरसीबीला दोन विजेतेपदं मिळवून देत इतिहास रचला. पत्रकार परिषेदसाठी पोहोचलेला आयपीएल विजेता कर्णधार रजत पाटीदारने आपल्या शेजारी ठेवलेल्या ट्रॉफीकडे पाहिलं. ट्रॉफीच्या तळाशी कोरलेलं ‘2026 – Royal Challengers Bengaluru’ हे नाव काही क्षण न्याहाळलं आणि मग हसत म्हणाला, खूप छान वाटतंय. आज माझा वाढदिवसही आहे, त्यामुळे यापेक्षा चांगलं गिफ्ट असूच शकत नाही.”
रजत पाटीदारसह संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील झालेल्या दिनेश कार्तिकचा देखील वाढदिवस आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर दिनेश कार्तिकने आरसीबीच्या मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारली. त्याने संघाची सांघिक रचना सुधारण्यासाठी काम केलं. त्याने संघाची आयपीएल ट्रॉफीसाठीची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवण्याचं वचनही दिलं होतं. जे २०२५ मध्ये खरं ठरलं, जेव्हा रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने १८ वर्षांनी प्रथमच आयपीएल विजेतेपद पटकावलं.
दिनेश कार्तिक म्हणाला, “माझ्यासाठी ही सर्वोत्तम वाढदिवसाची भेट आहे. आरसीबी परिवाराने १८ वर्षांची प्रतीक्षा संपवून सलग दोन विजेतेपदे जिंकून इतिहास रचला आहे. माझ्या छोट्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवणाऱ्या खेळाडूंचा मी आभारी आहे.”
