Nuwan Thushara Moves To Court Against Srilanka Cricket Board: आयपीएल २०२६ स्पर्धेला दमदार सुरुवात झाली आहे. आतापर्यंत सर्व संघांचे १-१ सामने खेळून झाले आहेत. जवळपास सर्वच खेळाडू आपल्या संघासोबत जोडले गेले आहेत. तर काही परदेशी खेळाडू असे आहेत, जे काही कारणास्तव आपल्या संघासोबत जोडले गेलेले नाहीत. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एकतर्फी विजयाची नोंद केली. जोश हेझलवूड या संघाचा भाग आहे. पण तो पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता. यासह श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषारा देखील या संघाचा भाग आहे. पण श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) न दिल्याने तो भारतात येऊ शकलेला नाही. ही स्पर्धा खेळू न दिल्याने त्याने मोठा निर्णय घेतला आहे.

आयपीएल २०२६ स्पर्धा खेळण्यासाठी श्रीलंकेचे काही खेळाडू भारतात आले आहेत. जे खेळाडू भारतात आले आहेत, त्यांनी फिटनेस टेस्ट पास केली आहे. कारण ज्या खेळाडूंना आयपीएल खेळायची आहे, त्या खेळाडूंना फिटनेस टेस्ट पास करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. नुवान तुषाराला श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचलं आहे.

नुवान तुषाराने आता कोलंबो जिल्हा न्यायालयात धाव घेत श्रीलंका क्रिकेटला ना हरकत प्रमाणपत्र जारी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, या याचिकेवर ९ एप्रिलला सुनावणी होणार आहे. नुवान तुषाराने २०२२ पासून ३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये श्रीलंकेचं प्रतिनिधित्व केलं आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डासोबत असलेला त्याचा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट ३१ मार्चला समाप्त झाला आहे. त्यानंतर हा सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट वाढवण्यात आलेला नाही.

नुवान तुषाराला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करायची आहे, त्यामुळे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट पुढे वाढवू नका, याबाबत त्याने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला आधीच माहिती दिली होती. आता फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरल्यानंतरही त्याला ना हरकत प्रमाणपत्र नाकारल्याने त्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. ज्या खेळाडूला राष्ट्रीय संघात स्थान मिळवायचं असेल, त्या खेळाडूने फिटनेस टेस्ट पास करणं गरजेचं आहे,असं श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आधीच स्पष्ट केलं आहे. तुषाराने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्याच्या फिटनेसची पातळी कधीही कमी आढळली नव्हती आणि याच फिटनेसह त्याला खेळण्याची परवानगी देण्यात आली होती.